प्रत्येकाच्या मनात डोकावणार्या ‘संज्या छाया’ नाटकाने संगमनेर फेस्टिव्हलचा समारोप! संगमनेरात लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव ः डॉ.संजय मालपाणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सत्तरच्या दशकात भारतात शिक्षण घेवून पाश्चात्य देशांमध्ये चाकरीसाठी स्थलांतर घडण्याची लाटच आली होती. त्याकाळी कुचंबलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेने महत्त्वकांक्षी तरुणाईला आपल्या स्वप्नांच्या शोधात देशांतर करण्यास भाग पाडले. नोकरीसाठी परदेशी गेलेली आपली पाखरं आर्थिक सुबत्ता प्राप्त करुन माघारी घरट्यात परततील अशीच अपेक्षा ठेवून पालकांनीही त्यांच्या जाण्याला होकार भरला. मात्र पाश्चात्य देशात गेल्यानंतर तेथली प्रगती आणि संधी पाहून आपल्याकडे ती मिळणारच नाही असे गृहीत धरुन ही मंडळी तिकडेच स्थिरावली. इकडे आई-वडीलांना डॉलर्सची रसद पाठवून आणि प्रसंगी त्यांनाही आपल्याकडेच बोलावून त्यांचे ऋण फेडण्याचेही अयशस्वी प्रयोग झाले. त्यातून निवृत्तीनंतर आई-वडीलांना मुला-नातवंडाची प्रतीक्षा करीत एकाकी जीवन जगण्याची वेळ आली. यासर्व गोष्टी पचवणं त्यांना अशक्य झालं. त्यातून जे प्रश्न निर्माण होत गेले त्यावर आधारीत असलेलं ‘संज्या छाया’ हे शोकांत नाटक मंगळवारी संगमनेर फेस्टिव्हलच्या रंगमंचावर सादर झालं.

राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाद्वारा आयोजित संगमनेर फेस्टिव्हलचा मंगळवारी समारोप झाला. याप्रसंगी प्रशांत दळवी लिखीत व चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शीत केलेल्या ‘संज्या छाया’ या कौटुंबिक नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांच्या अभिनयातून साकारलेले हे नाटक उपस्थित रसिकांच्या मनात डोकावून गेले. प्रारंभी संगमनेर फेस्टिव्हलच्या आयोजनात समर्पण देणार्या कार्यकर्त्यांचा गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी संगमनेर फेस्टिव्हलचे जनक मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष रोहित मणियार, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, सचिव आशिष राठी व कोषाध्यक्ष उमेश कासट आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. मालपाणी म्हणाले की, दोन दशकांपूर्वी राजस्थान युवक मंडळ व गीता परिवाराने संगमनेरात जाणता राजा या महानाट्याचे आयोजन केले होते. त्यानंतर केवळ तेथेच न थांबता त्या महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे सांगितलं गेलं ‘यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, जयवंत जाणता राजा’ हे विशेषण प्रत्येक संगमनेरकरांमध्ये यावे, त्यांच्यातला स्पर्धक यशवंत व्हावा यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. संगमनेरची कीर्ती वाढवणारी जी विशेष मंडळी आहेत्यांना कीर्तीवंत हे बिरुंद देण्यासाठी, सामर्थ्यवंत बनविण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन आणि वरदवंत, पुण्यवंत बनविण्यासाठी गणेश भक्तीचा मार्ग दाखवणार्या संगमनेरचे फेस्टिव्हलचे गेल्या 15 वर्षांपासून सातत्यपूर्ण आयोजन होत आहे.

संगमनेर फेस्टिव्हलच्या मंचावर सादर झालेल्या ‘संज्या-छाया’ या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय बेतोड असेच होते. प्रदीप मुळ्ये यांनी केलेले प्रसंगानुरुप नेपथ्य नाटकाला वास्तवात उतरविणारे ठरले. पुरुषोत्तम बेर्डे यांचे पार्श्वसंगीत संपूर्ण नाटकात जोश आणि उत्साह भरणारे होते. वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांनी साकारलेल्या प्रमुख भूमिका रसिकांच्या मनात घर करुन गेल्या. रवी-रसिक यांनी केलेली प्रकाशयोजना प्रसंगानुरुप होती. दास वैद्य यांनी लिहिलेले आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले नाटकातील इंग्रजी गीत उपस्थित प्रत्येकालाच गुणगुणायला लावणारे ठरले. उमेश खंदारे यांनी पात्रांची रंगभूषा तर प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांनी वेशभूषा सांभाळली. दोन तास पुरेपूर करमणूक करणारे, चांगला सामाजिक संदेश देणारे, मनाला थेट भिडणारे आणि मनोमन भावणारे असे हे नाटक हसत-खेळत जीवन जगण्याची नवी परिभाषा शिकवून जाणारे ठरले.
