मान्सूनपूर्व पावसात वाहून गेला संगमनेरचा ‘विकास’! अंतर्गत रस्त्यांचे गटारात रुपांतर; एकावर एक पाईप टाकूनही शहर तुंबलेलंच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विकासाच्या नावाखाली गेल्या दोन-तीन वर्षांपासून शहरातील अंतर्गत रस्ते वारंवार खोदून त्याखाली गाडण्यात आलेल्या पाईपांनी पालिकेच्या विकासाची पोलखोल केली. एकीकडे महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनच्या आगमनाने संगमनेरकर सुखावलेला असताना दुसरीकडे संगमनेरात झालेल्या मान्सूनपूर्व पावसात शहरातील निम्म्याहून अधिक अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले. गटाराशेजारी गटार बांधण्याचा विक्रम साधलेल्या संगमनेर नगरपालिकेने शहरातंर्गत सांडपाण्याच्या व्यवस्थेवर आजवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. मात्र तो सगळा पहिल्याच पावसांत वाहून गेल्याचे चित्र गुरुवारी शहरात बघायला मिळाले. जलमय झालेल्या रस्त्यांसह उफाळलेल्या नाल्यांचे पाणी काही वसाहतींमध्ये शिरल्याने अनेक रहिवाशांना मोठा मनस्ताप झाला. रस्ते तुंबण्याच्या प्रकारातून खूद्द नगराध्यक्षाही वाचल्या नाहीत. त्यांच्या निवासाकडे जाणारा रस्ताही अवघ्या 24 मिलीमीटर पावसांतच गुटघाभर पाण्यात तर, बसस्थानकापासून भूमी अभिलेखपर्यतचा नवीननगर रोड नेहमीप्रमाणे लेंडीनाल्याच्या प्रवाहात परावर्तीत झाला होता.

अपेक्षेपेक्षा अगोदरच गुरुवारी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. त्यामुळे सुखावलेल्या संगमनेरकरांना मान्सूनपूर्व पावसाचाही बोनस मिळाला. घरात असलेल्यांनी या पहिल्या पावसाचा आनंद घेतला. मात्र कामानिमित्त, शाळा-कॉलेजात, बाजारात आणि इतर कारणांनी घराबाहेर पडलेल्या सामान्य नागरीक व विद्यार्थ्यांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पालिकेने गेल्या काही वर्षात शेकडों कोटी रुपयांचा खर्च करुन भूयारी गटारांच्या नावाखाली शहराच्या ऐतिहासिक सांडपाणी प्रक्रियेला कालबाह्य ठरवून नव्याने सिमेंटचे पाईपच्या गटाराचे काम केले. सदरचे काम करतांना जोर्वेनाका परिसरात उभ्या राहणार्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा विचार समोर ठेवला गेला. साहजिकच त्यामुळे शहरातील सर्व सांडपाणी वेगवेगळ्या गटारांद्वारा नियोजित ठिकाणी पोहोचवण्याच्या दृष्टीनेच त्याची तयारी केली गेली. प्रकल्पाबाबत ठोस निर्णय होण्यापूर्वीच कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन शहरातंर्गत भूयारी गटारी बांधण्यात आल्या.

प्रत्यक्षात जेव्हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामासाठी जमिनीची साफसफाई करण्यास सुरुवात झाली त्यावेळी परिसरातील रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला. त्या विरोधात साखळी आंदोलनाचेही हत्यार उपसले गेले. त्यामुळे जोर्वेनाका परिसरातील नियोजित प्रकल्पाला खीळ बसली. वास्तविक प्रकल्पाच्या कामाचा कार्यारंभ आदेशही त्याचवेळी काढण्यात आलेला आहे. सुमारे शंभर कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य अशा दोहींकडून निधी मिळाला असून काम सुरु झाल्यापासून ते किती दिवसांत पूर्ण करायचे याबाबतचे निर्देशही त्यावेळी देण्यात आले होते. मात्र रहिवाशांच्या विरोधासमोर प्रशासनाला माघार घ्यावी लागली व पर्यायी जागेच्या आश्वासनावर त्यावेळी उपोषणाची सांगताही झाली होती.

प्रकल्पाचे काम सुरु होण्यापूर्वीच संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते भूयारी गटारांसाठी खोदण्यात आले होते. त्यानंतर काही महिन्यांत पिण्याच्या पाण्याचे पाईप टाकण्यासाठी पुन्हा बहुतेक तेच रस्ते फोडण्यात आले. काही महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा रस्त्यांचे खोदकाम करुन प्रक्रिया प्रकल्पाचे वेगळ्या पद्धतीचे पाईप गाडण्यात आले. याचाच अर्थ गेल्या तीन वर्षात शहरातील बहुतेक रस्ते एकदा दोनदा नव्हेतर तीन तीनवेळा फोडण्यात आले. आता यामागे पालिकेतील वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आहे की, जाणीवपूर्वक राबवलेला हा मलाईदार कार्यक्रम आहे हा संशोधनाचा विषय ठरेल.

वारंवार रस्ते फोडून आणि गटारांचे काम होवूनही गुरुवारी मान्सूनपूर्व पावसांतच त्याची पोलखोलही झाली आणि या पावसाच्या पाण्यात कोट्यवधींचा ‘तो’ खर्चही वाहून गेला. अवघ्या 24 मिलीमीटर पडलेल्या या पहिल्याच पावसाने शहरातील जवळजवळ सगळ्याच रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप मिळवून दिले. पाण्याचा निचरा होण्याचीच व्यवस्था नसलेल्या प्रत्येक रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. वैभवशाली शहराची टीमकी वाजवणार्या शहराच्या बसस्थानकापासून ते भूमी अभिलेख कार्यालयापर्यंतच्या परिसराला तर लेंडी नदीचे स्वरुप आले होते. शहरातील सर्वात रहदारीचा आणि पुण्याच्या जंगली महाराज रस्त्याशी तुलना होणार्या नवीन नगर रस्त्यावरील जमिनीखाली असलेल्या अनेक गाळ्यांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे काही व्यापार्यांचा मालही भिजला.

घराकडे निघालेल्या गृहीणी, विद्यार्थीनींच्या मोपेड गुडघाभर पाण्यात बंद पडल्याने पाण्याच्या प्रवाहात त्या लोटून नेण्याचे कसब त्यांना करावे लागले. उपनरांमधील अवस्थाही यापेक्षा वेगळी नव्हती. पालिकेतील निवृत्त कर्मचार्यांची वसाहत असलेल्या सिद्धिविनायक सोसायटीत पावसासोबतच लेंडी नाल्यातील पाणीही शिरल्याने रहिवाशांची मोठी धावपळ उडाली. थेट घरातच गटाराचे घाण पाणी शिरल्याने बहुतेकांच्या घरातील कपडे, इलेक्ट्रीक वस्तू व फर्निचरचेही नुकसान झाले. गटार बांधण्यासह रस्ते तयार करतांना पावसाच्या प्रवाहाचा विचारच केला गेला नाही. त्याचा परिणाम अनेक रस्त्यांवर तळे साचल्याचेही दिसून आले. अशा तळ्यांच्या कामांमधून शहराच्या नगराध्यक्षाही सुटल्या नाहीत. त्यांच्या घराकडे जाणारा रस्ताही पाण्याखाली बुडाला होता.

एकंदरीत गेल्या दोन-तीन वर्षांपासून विकासाच्या नावाखाली पालिकेकडून गटारावर गटार, पाण्याच्या लाईन, सांडपाणी प्रकल्पाची लाईन अशा कारणांनी वारंवार शहरातील रस्ते फोडले गेले. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा खर्च केला गेला. यातून शहरातील सांडपाण्यासह पावसाचे पाणी वाहून जाण्याची आदर्श व्यवस्था उभी राहण्याची गरज होती. मात्र इतका खर्च करुनही किरकोळ पावसांतच जवळजवळ संपूर्ण शहरच तुंबलेले असल्याने त्यातून पालिकेच्या ‘विकासा’चे पितळही उघडे पडले आहे. केवळ ठेकेदारी आणि कमिशन खोरीसाठी अकुशल आणि आडहत्यारी माणसांना कामाचे ठेके देवून कोट्यवधीची उधळपट्टी झाल्याचेही या पहिल्याच पावसाने उघडे केले आहे.

