राहात्यात व्यापारी संकुलात पावसाचे पाणी घुसले लाखो रुपयांचे नुकसान; गाळेधारकांचे रास्ता रोको आंदोलन
नायक वृत्तसेवा, राहाता
एकाच आठवड्यात दोनवेळा व्यापारी संकुलात पावसाचे पाणी जाऊन लाखो रुपये नुकसान झालेल्या संतप्त गाळेधारकांनी नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत नगर-मनमाड महामार्गावर मंगळवारी (ता.6) रात्री रास्ता रोको करत नुकसान झालेल्या मालाचे जोपर्यंत पंचनामे होत नाही तोपर्यंत दुकाने उघडणार नाही अशी भूमिका घेत प्रशासनाचा निषेध करत ठिय्या आंदोलन केले.
प्रत्येक पावसाळ्यात राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात पावसाचे पाणी जाऊन व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान होते. नगरपरिषद प्रशासनाला यावर तत्काळ उपयोजना करा असे अनेकदा सांगूनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. गणेश स्थापनेच्या दिवशी शहरात रात्री 9 वाजता अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. येथील गाळेधारक दुकान बंद करून घरी गेले होते. पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने गाळेधारकांनी भर पावसात येऊन दुकानातील माल पावसाच्या पाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे तसेच पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे व्यवसायिकांना दुकानातील वस्तू सुरक्षित ठिकाणी नेता आल्या नाही. परिणामी 6 दिवसांपूर्वीच येथील व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पावसामुळे झालेल्या दुकानाचे पंचनामे करावे तसेच तात्काळ या ठिकाणी पावसाचे साचलेले पाणी उपसा करण्याकरिता उपाययोजना कराव्या अशी मागणी 1 सप्टेंबर रोजी सकाळी गाळेधारकांनी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्याकडे केलेली होती. 5 दिवस होऊन गेले तरी प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही. मंगळवारी पुनरावृत्ती झाली. राहाता शहरात रात्री 7 वाजेनंतर अचानक मुसळधार पावसाने परिसर झोडपून काढला. परिणामी राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स याठिकाणी पुन्हा व्यावसायिकांच्या दुकानात पावसाचे पाणी गेल्याने गाळेधारकांची पुन्हा लाखो रुपयांचे नुकसान झाली. यावर्षीच्या पावसाळ्यात 4 ते 5 वेळा व या आठवड्यात दोनवेळा पावसाचे पाणी दुकानात जाऊन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
नगरपरिषदेला सांगूनही त्यांच्याकडून कुठलीही दखल होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या गाळेधारकांनी मंगळवारी रात्री 8.30 वाजता प्रशासनाचा निषेध करण्याकरिता नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको करून प्रशासनाच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करत नुकसान झालेल्या मालाचे तत्काळ पंचनामा करून व्यावसायिकांना नुकसान भरपाई द्यावी, नगरपरिषदेने गाळे परत घेऊन आमची अनामत रक्कम परत द्यावी अशा विविध मागण्या करत महामार्गावर 20 ते 25 मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना रास्ता रोको मागे घेण्यास सांगितले. यावेळी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना आंदोलकांनी घेराव घालून नुकसान झालेल्या मालाची तत्काळ पंचनामे करा जोपर्यंत पंचनामे करणार नाही तोपर्यंत गाळे उघडणार नाही गाळे परत घ्या व आमचे डिपॉझिट परत द्या अशा विविध घोषणा देत गाळेधारकांनी नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला. मुख्याधिकार्यांनी तहसीलदार कुंदन हिरे यांच्याबरोबर चर्चा करून बुधवारी सकाळी नुकसान झालेल्या मालांची पंचनामे करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त झालेल्या व्यावसायिकांनी आपले आंदोलन तूर्त मागे घेतले.
पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी स्वतः गाळेधारकांच्या गळ्यात घातलेल्या पाण्यात उतरून पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी धनंजय गाडेकर, अॅड. समीर करमासे, मनसेचे विजय मोगले, सचिन वराडे, सतीश वाघ, विशाल मंडलिक, बबलू बनकर, किरण खडांगळे, शब्बीर मंसुरे, नंदकुमार गाडेकर, गजानन सावंत, शिवराज गायकर, अनिल पवार, प्रगती खडांगळे, लीना खंडारे, राजू मणियार, वाल्मिक सदाफळ, वाल्मिक गोसावी, वच्छाबाई मडवई यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील गाळेधारक व नागरिक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होते.