अमृतवाहिनी शिक्षण संस्था शिक्षणाची गंगोत्री : कुलगुरू डॉ. कालकर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शैक्षणिक गुणवत्ता, उत्कृष्ट व्यवस्थापना बरोबरच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यावसायिक व स्वावलंबी बनवणारे शिक्षण हे अमृतवाहिनी संस्थेतून दिले जाते. त्यामुळेच या संस्थेने देश पातळीवर गुणवत्तेच्या बाबतीत नाव लौकीक मिळवला असून अमृतवाहिनी शिक्षण संस्था ही खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगोत्री असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. पराग कालकर यांनी केले.

अमृतवाहिनी महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पराग कालकर यांनी नुकतीच भेट दिली व विद्यार्थ्यांची संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, संस्थेचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. पराग कालकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनात ध्येय, कृती आणि वास्तव यांचा संगम असणे गरजेचे आहे. नकाशाशिवाय जशी इमारत बांधता येत नाही तसेच ध्येय ठरवले नसल्यास यश मिळत नाही. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी आपली ध्येय निश्चिती करून जिद्द व चिकाटीने अभ्यास करून ते मिळवणे गरजेचे आहे. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर व्यावसायिक ज्ञानही विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ सोशल मीडियाच्या मागे न लागता ग्रंथालयामध्ये बसून अभ्यास करणे गरजेचे आहे. वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. अमृतवाहिनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी खूप संधी असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्राचार्य डॉ. बाबासाहेब लोंढे म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी एमबीएने देशात आपला ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी महाविद्यालय प्रयत्न करत असून राज्य पातळीवर विविध मानांकने मिळाली असल्याचे ते म्हणाले.यावेळी डॉ. पराग कालकर यांच्या हस्ते अमृत ट्रॉफी इव्हेंट या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. पराग कालकर यांनी या इव्हेंटचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

Visits: 51 Today: 1 Total: 1421172
