पालिकेने यावर्षीची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी ः खताळ
पालिकेने यावर्षीची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी ः खताळ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘कोविड-19’ महामारीमुळे जागतिक स्तरावर मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. या संकटामुळे शहरातील सर्व व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक आणि सरकारी नोकरांपासून सर्वांच्या आर्थिक उत्पन्न, व्यवसायावर प्रचंड ताण पडलेला आहे. शिवाय अनेक लोक सध्या घराघरातील आजारपण, बेरोजगारी वगैरेमुळे आर्थिक ताणाताणीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे संगमनेर नगरपालिकेने यावर्षीची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी निवेदनातून पालिका प्रशासनाकडे केली आहे.
संगमनेर शहर मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे विकासकामेही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. विविध निवासी इमारती, व्यापारी कॉम्प्लेक्स यांचीही भर पडत आहे. त्यातून पालिकेला वेळोवेळी घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून कर रुपाने जादा उत्पन्नही मिळालेले आहे. पालिकेला खर्चही मोठ्या प्रमाणावर करावा लागतो याचीही नागरिकांना जाणीव आहे. परंतु, कोरोना महामारीसारखी आपत्ती यापूर्वी कधीही आलेली नव्हती. त्यामुळे नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी भरण्याबाबत विरोध केलेला नाही. तरी कोरोनाच्या महामारीमध्ये माणुसकीच्या दृष्टीने नागरिक आर्थिकदृष्ट्या होरपळून निघत असताना त्यांना दिलासा देण्यासाठी पालिका प्रशासन व पदाधिकार्यांनी यावर्षीची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करून एक नवीन आदर्श निर्माण करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते खताळ यांनी केली आहे.