शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा ः धस टाकळीभानमधील आढावा बैठकीत गटविकास अधिकार्यांच्या सूचना
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील टाकळीभान येथे कोरोनाच्या पहिल्या मात्रेचे लसीकरण 70 टक्के झाले असून 30 टक्के लसीकरण शिल्लक राहिले आहे. गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांनी केले.
टाकळीभान ग्रामपंचायतमध्ये लसीकरणा बाबत गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी पुढे बोलताना धस म्हणाले, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची जिल्ह्यात एन्ट्री झाली असून श्रीरामपूर येथे एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, येथे 70 टक्के लसीकरण झाले असून 30 टक्के लसीकरण होणे अद्याप बाकी आहे. ते शंभर टक्के होण्यासाठी प्रयत्न करावेत. लस न घेणार्यांचे रेशन व इतर सुविधा बंद कराव्यात, रेशन दुकानदारांनी लस न घेतलेल्या नागरिकांना रेशन देवू नये, असे उपस्थित असलेल्या रेशन दुकांनदारांना त्यांनी सांगितले. याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा व मास्क न वापणार्यांवर कारवाई करावी, असे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाला सांगितले.
टाकळीभान तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्याने लसीकरणासाठी ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. पहिली मात्रा झाली आहे, त्यांना दुसरी मात्रा घेण्यासाठी व लस न घेतलेल्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. दुकानदार, भाजी विक्रेते यांचे लसीकरण झाले आहे किंवा नाही, याची खात्री करावी. त्यांचे लसीकरण झाले नसेल तर त्यांचे लसीकरण करून घ्यावे. एकूणच लसीकरण शंभर टक्के होण्यासाठी प्रभागनिहाय लसीकरण करावे, त्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या प्रभागात जावून लसीकरणासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असे धस यांनी सांगितले. यावेळी ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव, अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा महाविकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, यशवंत रणनवरे, ग्रामपंचायत सदस्य मयूर पटारे, सुनील बोडखे, जयकर मगर, बाबा सय्यद, विजय देवळालीकर, बापूसाहेब नवले, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.