देवगडला अधिकमास सप्ताहाची सांगता
देवगडला अधिकमास सप्ताहाची सांगता
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड कोरोनाच्या महामारीमुळे दर्शनासाठी बंद असल्याने यावर्षी अधिकमास सप्ताह छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यात आला. मोजक्याच भक्तगणांच्या उपस्थितीत झालेल्या अधिकमास सप्ताहाची सोमवारी (ता.28) भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली.

दर तीन वर्षांनी येणार्या पुरुषोत्तम म्हणजेच अधिकमासानिमित्ताने देवगड येथे अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोना महामारीचे मोठे संकट असल्याने देवगड दर्शन बंद आहे. यावर्षी देवगडच्या विद्यार्थ्यांनीच येथे छोटेखानी स्वरूपात आलेल्या अधिकमास महिन्यात खंड नको म्हणून भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायणाचे वाचन केले. यामध्ये पंचवीस ते तीस भाविकांच्या उपस्थितीत कीर्तनाचे कार्यक्रम भगवान दत्तात्रयांच्या मंदिरात पार पडले. दरम्यान, सोमवारी मोजक्याच भक्तगणांच्या उपस्थितीत झालेल्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी बोलताना भास्करगिरी महाराज म्हणाले, अधिकमासाला मल्लमास व पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. हा महिना भगवंताचे नामस्मरण व चिंतन करण्याचा पवित्र असा महिना आहे. कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता धैर्याने त्याचा सामना करा. भगवंताच्या नामचिंतनाची त्याला जोड द्या, जीवनात येणारे अडथळे दूर करत ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न करा, निर्माण होणार्या समस्यांचा विचारानेच पराभव करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, नारायण महाराज ससे, मारुती महाराज काळे, विजय महाराज पवार, दादा महाराज साबळे, मृदुंगाचार्य गिरीजानाथ जाधव, हिराताई महाराज मोकाटे, रामनाथ महाराज पवार, सीताराम जाधव, लक्ष्मण नांगरे, रामजी विधाते, बजरंग विधाते, लक्ष्मीनारायण जोंधळे, बदाम पठाडे, काशिनाथ नवले, ज्ञानदेव लोखंडे, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, बाळू कानडे, मारुती साबळे, महेंद्र फलटणे, सरपंच अजय साबळे, संदीप साबळे, रामेश्वर तनपुरे उपस्थित होते. शेवटी बाळासाहेब पाटील यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

