नेवासा येथील गणपती घाट प्रांगणात वृक्षारोपण उपक्रम
नेवासा येथील गणपती घाट प्रांगणात वृक्षारोपण उपक्रम
संवर्धन करून वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्याचा युवकांचा निर्धार
नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा येथील गणपती घाट प्रांगणात नुकतेच युवकांनी एकत्र येत वृक्षारोपण केले आहे. सदर वृक्षांचे संवर्धन व संगोपन करून पुढील वर्षी या वृक्षांचा देखील वाढदिवस साजरा करण्याचा निर्धार यावेळी युवकांनी व्यक्त केला. नगरसेवक राजेंद्र मापारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला. वृक्ष संवर्धनासाठी वृक्ष लागवड मोहिमेला चळवळ बनवा असे आवाहन वृक्षमित्र अमृत फिरोदिया यांनी यावेळी बोलताना केले.
नेवासा येथील प्रवरा नदीच्या तिरावर असलेल्या गणपती घाटाच्या प्रांगणात गुलमोहर, करंजी, कडूनिंब, वड, पिंगळ अशा एकूण अकरा वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांना रोज पाणी घालून त्यांना संरक्षक जाळी देऊन ती वृक्ष मोठी करण्याचा व पुढील वर्षी याच तारखेला या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्धार जय हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील मापारी यांनी केला.
यावेळी पत्रकार सुधीर चव्हाण, वृक्षमित्र अमृत फिरोदिया, आशिष कावरे यांनी युवकांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले व वृक्षसंवर्धनासाठी युवकांनी व सामाजिक संघटनांनी पुढे यावे असे आवाहन केले. तर नगरसेवक राजेंद्र मापारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपस्थितांच्या हस्ते त्यांचा सत्काराद्वारे गौरव करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दीपक जोशी, श्यामराव देशपांडे, सूर्यकांत सदभावे, नितीन देशमुख, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील मापारी, युवा मोर्चा उपशहराध्यक्ष निखील जोशी, सोमेश मापारी, रोहित डोमकावळे, रोहन मुथ्था, कानिफनाथ भोंगदळ, सोनू वाळेकर, मंगेश गोसावी, गणेश चौधरी, नगरपंचायत कर्मचारी कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.