पंतप्रधान आवास योजनेचा अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात! संगमनेरच्या मोगलपूर्‍यात यशस्वी ‘ट्रॅप’; गरिबांची घरकूले मंजूर करण्यासाठीही लाच..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
बेघरांना घरे मिळावी यासाठी देशात सुरु असलेल्या पंतप्रधान आवास योजनेत घरकूले मंजूर करण्यातही भ्रष्टाचार होत असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारकडून गोरगरीबांसाठी राबवण्यात येत असलेल्या या योजनेतून डोक्यावर छत नसलेल्यांना घरे बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. मात्र आता अशा लाभार्थ्यांची घरकूले मंजूर करण्यासाठीही पैसे घेतले जात असल्याचे उघड झाले असून या योजनेचे काम करणारा कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात फसला आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास संगमनेरातील मोगलपूरा परिसरात असलेल्या एका तांदळाच्या दुकानात नाशिक एसीबीने ‘ट्रॅप’ लावून गरीबांच्या अर्ध्या भाकरीवरही डल्ला मारणार्‍या विकास जोंधळे या लाचखोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदरचा अभियंता हा शहरातील घरकूलांचे कामकाज बघत होता व त्याची बैठक पालिकेच्या कार्यालयात होती.


याबाबत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या अनेक दशकांपासून देशात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत बेघरांना घरे बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान देण्यात येते. मागील दहा वर्षात या योजनेची व्याप्ती वाढवून अनुदानाची रक्कमही घसघसीत करण्यात आल्याने व त्यातच त्यासाठीचे निकषही पूर्णतः बदलण्यात आल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कोट्यवधीत गेली आहे. संगमनेरातही या योजनेचे हजारों लाभार्थी आहेत. अर्जदारांची संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने राज्य सरकारच्या सहकार्याने प्रत्येक राज्यात खासगी एजन्सी (नेमून) त्यांच्या मार्फत प्रत्येक तालुक्यात अशा खासगी अभियंत्याची (वास्तू विशारद) नियुक्ती केली आहे.


विकास जोंधळे हा ठेकेदाराकडून नियुक्त झालेला अभियंता होता. मोगलपूर्‍यातील तक्राराने घरकूलासाठी पालिकेत जावून या अभियंत्याकडे अर्ज दिला होता. तो मेजूर होवून आल्यानंतर अनुदानाचा पहिला हप्त्याचा धनादेश देण्यासाठी त्याने 17 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार आजरोजी (ता.3) सायंकाळी मोगलपूर्‍यातील एका तांदळाच्या दुकानात लाचेची रक्कम देण्याचे ठरले होते. मात्र तत्पूर्वीच तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीचे निरीक्षक संदीप साळुंखे यांनी आपल्या पथकासह संगमनेरात येवून मोगलपूर्‍यात सापळा रचला.


ठरल्याप्रमाणे लाचखोर अभियंता विकास सुरेश जोंधळे (वय 28, रा.कोकणगाव, ता.संगमनेर) तेथे आला व त्याने तक्रारदाराकडून 17 हजारांची लाच स्वीकारली. त्याचवेळी आसपास दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या पथकातील पो.नि.साळुंखे यांच्यासह हवालदार पंकज पळशीकर, पोलीस नाईक प्रकाश महाजन, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी झडप घालीत त्याला रंगेहात चतुर्भूज केले. त्यानंतर संबंधीत प्रकरणाच्या चौकशीकामी आणि कागदपत्रे मिळवण्यासाठी ‘त्या’ लाचखोराला संगमनेर नगरपालिकेच्या कार्यालयातही आणण्यात आले होते.


त्यामुळे पालिकेच्या वर्तुळातही मोठी खळबळ उडाली होती. अनेकांनी बाहेरुनच अंदाज बांधून पालिकेत ट्रॅप झाल्याची आवई देखील उठवली. मात्र सरतेशेवटी सदरचा प्रकार पालिकेत नव्हेतर मोगलपूर्‍यात घडल्याचे व लाचखोर अधिकारी पालिकेचा नव्हेतर राज्य सरकारकडून नियुक्त खासगी कंपनीचा अभियंता असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेवून शासकीय विश्रामगृहावर आणण्यात आले असून सध्या त्याचे जाबजवाब नोंदविले जात आहेत. यानंतर त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होवून त्याची रवानगी कारागृहात केली जाईल. या वृत्ताने पालिकेसह संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *