संगमनेर तालुक्यातील ग्रामीणभागात कोविडचा प्रादुर्भाव वाढला! सवलतीच्या कालावधीत कोविड नियमांकडे दुर्लक्ष करुन लग्नसोहळे होवू लागल्याचा परिणाम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड नियमांकडे दुर्लक्ष करुन लग्न सोहळे आणि राजकीय आखाडे भरात आल्याने राज्याला संक्रमणाची दुसरी त्सुनामी सोसावी लागली. त्यातून सावरत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण होत असतांना आता पुन्हा तीच चूक पुन्हा घडत असल्याचे आजच्या अहवालातून समोर आले आहे. गेल्या आठवडाभर तिशीच्या आंत राहीलेली तालुक्याची रुग्णसंख्या आज उसळून थेट 54 रुग्णांवर गेली आहे. आजच्या बाधितांमध्ये संगमनेर शहरातील अवघ्या चार जणांचा समावेश आहे, प्राप्त अहवालात बाधितांची एकूण संख्या 57 दर्शविली गेली असली तरीही त्यातील तिघांची नावे दुबार आहेत. आजच्या वाढलेल्या रुग्णसंख्येने तालुक्याला 23 हजारांचा टप्प्यापार नेले असून एकूण रुग्णसंख्या 23 हजार 19 झाली आहे.

मागील आठ दिवसांपासून तालुक्याच्या रुग्णसंख्येला उतार लागला होता. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत तालुक्यातील रुग्णसमोर येण्याचा सरासरी दर थेट 32 पर्यंत खाली होता. त्यातही जूनच्या शेवटच्या आठवठ्यापासून रुग्णसंख्यने तिशीच्या आत प्रवेश केल्याने तालुक्यातील संक्रमण नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसू लागले होते. मात्र गुरुवारी (ता.1) अचानक रुग्णसंख्येला काहीसा वेग येवून संक्रमण वाढत असल्याचा इशारा मिळाला. एखाद्या दिवशी होतं असं असे वाटत असताना आज गेल्या आठवड्याच्या दैनिक सरासरीच्या दुप्पट वेगाने रुग्ण समोर आले. याचाच अर्थ शासनाने संक्रमण कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर व कोविड नियमांचे पालन करण्याच्या अटीवर दिलेली सवलत काहीजण चुकीच्या पद्धतीने वापरीत असल्याचे दिसून येवू लागले आहे.

सध्या लग्नसोहळ्यांचा बहार आहे. आपल्या पाल्याचे लग्न धुमधडाक्यात करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र सध्याची स्थिती भयानक आहे. संक्रमणाची दुसरी लाट खुप वेदना देवून गेली आहे. आपल्या आजूबाजूचे अनेकजण अचानक आपल्यातून निघून गेले आहेत. दुसरी लाट आणण्यासाठी आपल्याकडून अशाच चुका झाल्या होत्या. आता पुन्हा त्याच पुनरावृत्ती दिसू लागल्याने व अशा सोहळ्यांना राज्यातील मोठ्या नेत्यांचीही हजेरी दिसू लागल्याने कोविड संक्रमणाची तिसरी लाट हळूहळू आपल्या दिशेने सरकत असल्याचे चित्रही आता निर्माण होण्यास सुरुवात झाल्याचे नव्या महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांतच दिसून आले आहे. या दोन दिवसांत तालुक्यातून 87 रुग्ण समोर आले असून सरासरी दर 43.5 झाला आहे. मागील आठवड्यात हाच दर 32 होता. यावरुन तालुक्याच्या ग्रामीणभागात कोविड नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही दिसून आले असून गुरुवारी सोळा तर आज तब्बल 29 गावांमधून पन्नास रुग्ण समोर आले आहेत.

आज शासकीय प्रयोगशाळेचा एक, खासगी प्रयोशाळेचे 35 आणि रॅपिड अँटीजेनच्या 21 अहवालातून शहरातील चौघांसह तालुक्यातील 57 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले. त्यात तिघांची नावे दुबार आहेत. संगमनेर असा उल्लेख केलेल्या शहरातील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 41 व 29 वर्षीय महिला व 20 वर्षीय तरुणी तर ग्रामीण भागातील घुलेवाडी येथील 57 वर्षीय इसमासह 55 व 44 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुणी आणि 11 व आठ वर्षीय मुली, मालदाड येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 47 वर्षीय इसम, निळवंडे येथील 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खळी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मनोली येथील 47 वर्षीय इसम, पिंपळे येथील 26 वर्षीय तरुण,

खांडगाव येथील 81 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 42 व 38 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुणी व बारा वर्षीय मुलगी, घारगाव येथील सतरा वर्षीय तरुण, कोंची येथील 46 वर्षीय इसम, मिर्झापूर येथील सहा वर्षीय बालक, सुकेवाडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 41 वर्षीय महिला, दाढ बु. येथील 47 वर्षीय इसम, पिंपरणे येथील 26 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 70 वर्षीय महिला, साकूर भागातील देवी पठार येथील 30 व 28 वर्षीय महिलांसह 9 वर्षीय मुलगी, बिरेवाडीतील 36 वर्षीय तरुण व साकूर मधील 40 वर्षीय इसम, चंदनापूरीतील 45 वर्षीय इसम, चिंचोली गुरव येथील 70 वर्षीय महिला, जोर्वे येथील 29 वर्षीय महिला, आश्वी बु. येथील 45 वर्षीय महिला,

रहिमपूर येथील 32 वर्षीय तरुण, डोळासणे येथील 20 वर्षीय तरुण, तांगडी येथील 41 व 34 वर्षीय महिलांसह 17, 16 व सात वर्षीय मुली, माळेगाव येथील 45 वर्षीय इसमासह 36 वर्षीय महिला, कोठे बु. येथील 32 वर्षीय तरुणासह 28 वर्षीय महिला, आंबी खालसा येथील 50 वर्षीय इसम, सावरगाव घुले येथील 34 वर्षीय महिला व जवळे बाळेश्वर येथील सहा वर्षीय बालकाला कोविडचे संक्रमण झाले आहे. आजच्या अहवालातून तालुक्याच्या ग्रामीणभागातील संक्रमणात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोविड संक्रमणाच्या तिसर्या लाटेचा धोका वाढत असल्याचे दिसू लागल्याने नागरिकांसह प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा ‘येऽ रे माझ्या मागल्या..’ प्रमाणेच तिसर्या संक्रमणाला आमंत्रण मिळेल.

संगमनेर तालुक्यासह आज जिल्ह्यातील संक्रमणातही काहीशी वाढ झाली. आजच्या अहवालात पारनेर तालुक्यातून 74, पाथर्डी 60, संगमनेर 57, कर्जत 54, श्रीगोंदा 46, राहाता 32, राहुरी 25, अहमदनगर महापालिका क्षेत्र व जामखेड प्रत्येकी 21, शेवगाव 17, श्रीरामपूर 15, अकोले 11, कोपरगाव, नेवासा आणि नेगर ग्रामीण प्रत्येकी दहा आणि इतर जिल्ह्यातील नऊ अशा एकूण 472 जणांना कोविडची लागण झाली आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 80 हजार 813 झाली आहे.


