आगामी निवडणुका पारदर्शी होण्यासाठी पोलीस निरीक्षकांना बदला! राजकीय नातेसंबंध असल्याचा अमोल खताळ यांचा दावा; अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या दीड वर्षांच्या कारकीर्दीत वारंवार वादग्रस्त ठरत असलेले शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख पुन्हा खिंडीत अडकले आहेत. त्यांचे स्थानिक राजकीय नेत्यांशी नातेसंबंध असून आत्तापर्यंतची त्यांची येथील कारकीर्द ‘त्या’ राजकीय व्यक्तींना पोषक ठरल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निःपक्ष व निर्भय वातावरणात पार पडणार नसल्याची शंका व्यक्त करीत सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा हवालाही दिला असून आयोगाला त्यांच्याच 2018 सालच्या आदेशाची आठवणही करुन देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सदर तक्रारीची दखल घेवून त्यांच्यावर बदलीची कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात निरीक्षक देशमुख यांच्या विरोधात खताळ यांनी दाखल केलेली ही तिसरी तक्रार आहे. यापूर्वी त्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचेही गंभीर आरोप केले होते, मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नसतांना आता या नव्या आरोपाने पो.नि.देशमुखांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख संगमनेरच्या ज्येष्ठ राजकीय व्यक्तींच्या नातेसंबंधातील आहेत. त्यातूनच नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांना संगमनेरात नियुक्ति देण्यात आली. येथील पदभार हाती घेतल्यापासूनच पोलीस निरीक्षक देशमुख यांची वागणूक ‘त्या’ नातेवाईकाच्या राजकीय पक्षासाठी पोषक ठरली आहे. पालिकेतील पदाधिकार्‍यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी पो.नि.देशमुख यांनी वारंवार कायद्याच्या मर्यादा ओलांडल्या असून एका कार्यक्रमात तर त्यांनी चक्क गणवेशात असतानाही आपल्या राजकीय वरदहस्तासमोर लोटांगण घातल्याची छायाचित्रे उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. कायद्याने दिलेला गणवेश निःपक्षपाताची भूमिका घेवून कर्तव्य बजावण्याचे प्रतीक असताना त्यांची ही कृती अचंबीत करणारी असल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

मागील तीन दशकांपासून पालिकेत एकाच राजकीय पक्षाची सत्ता असून गेल्या दहा वर्षांपासून ‘त्या’ बड्या राजकीय कुटुंबातील व्यक्तिकडे पालिकेचे नेतृत्त्व आहे. शहरातील सर्व नागरिकांना समान गृहीत धरुन कायदा व व्यवस्था सांभाळण्याची घटनात्मक जबाबदारी असतांना जर एखादा पोलीस अधिकारी चक्क राजकीय व्यक्तिंसमोर नतमस्तक होत असेल तर त्यांच्याकडून नि:पक्ष वागणुकीची अपेक्षा कशी ठेवली जावू शकते असा सवालही खताळ यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठविलेल्या आपल्या तक्रारीत केला आहे. आगामी कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पो.नि.देशमुख यांची एकंदर भूमिका विचारात घेता त्यांच्याकडून नि:पक्षपणे कर्तव्यपूर्तीची अपेक्षा अतिशयोक्ती ठरणार असल्याने आयोगाने याचा गांभीर्याने विचार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.


कोविड संक्रमणाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या कालावधीत पोलीस निरीक्षक देशमुख एम.एच.17/सी.एम.1189 या क्रमांकाचे खासगी महिंद्रा बोलेरो वाहन वापरत होते. सदरचे वाहन ‘त्या’ राजकीय वरदहस्ताच्या नेतृत्त्वाखालील सहकारी संस्थेच्या नावाने नोंदणी आहे. सदरचे खासगी वाहन वापरण्यासाठी नियमानुसार पो.नि.देशमुख यांनी वरीष्ठ अधिकार्‍यांची परवानगी घेणे आवश्यक असतानाही त्यांनी तसे केलेले नाही, त्यातून त्यांची एकाच दिशेला जाणारी भूमिका आणि मनामानी काम करण्याची पद्धत स्पष्ट दिसत असल्याचेही खताळ यांनी म्हंटले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये तालुक्यातील पेमगिरी येथे ‘त्या’ राजकीय घराण्यातील तरुणीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला होता. त्याठिकाणी मर्यादेच्या पलिकडे जात, कार्यक्षेत्रात नसतानाही पो.नि.देशमुख तेथे तत्परतेने हजर होते असा दावाही या तक्रारीत करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या धोरणानुसार जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात लाचखोरीची कारवाई झाल्यास तेथील प्रभारी अधिकार्‍यांना दोषी धरुन नियंत्रण कक्षात जमा केले जात होते. त्यानुसार अकोले व संगमनेर येथे एका दिवसाच्या अंतराने तेथील पोलीस कर्मचार्‍यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली. नियमानुसार या कारवाईनंतर पोलीस अधीक्षकांनी अकोल्याचे निरीक्षक अभय परमार व संगमनेरचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांची तत्काळ नियंत्रण कक्षात बदलीही केली. पो.नि.परमार यांना सेवानिवृत्त होईस्तोवर पुन्हा कोणत्याही पोलीस ठाण्याचा पदभार मिळाला नाही, मात्र पो.नि.देशमुख चारच दिवसांत पुन्हा शहर पोलीस ठाण्यात रुजू झालेत याकडेही या तक्रारीतून राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष्य वेधण्यात आले आहे. वरील एकूण घटनांचा क्रम विचारात घेता संगमनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावर एका राजकीय घराण्याचा मोठा प्रभाव असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे त्यांच्या येथील कारकीर्दीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भयी, निःपक्षपाती व पारदर्शी वातावरणात पार पडण्याची कोणतीही शक्यता नाही. निवडणुकीच्या कालावधीत आपल्यावरील प्रभावाला प्रभावित करण्यासाठी त्यांच्याकडून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करुन मतदान प्रक्रीयेवर परिणाम घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर बदलीची कारवाई न झाल्यास आगामी निवडणूका दहशतीखालीच होतील अशी भीतीही त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठविलेल्या तक्रारीतून व्यक्त केली आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कर्तव्यदक्ष व निःपक्ष अधिकार्‍यांच्या देखरेखीखालीच पार पडाव्यात व आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सन 2002 साली दिलेल्या निर्देशांनुसार व राज्य निवडणूक आयोगाने सन 2018 साली काढलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची बदली होण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे यापूर्वी 27 ऑक्टोबर, 2021 व 23 फेब्रुवारी, 2022 रोजी सबळ पुरावे व छायाचित्रांसह तक्रार दाखल केली आहे, आता 10 मे, 2022 रोजी त्यांनी पुन्हा एकदा स्मरणपत्राद्वारे आयोगाला आपल्या तक्रारीची दखल घेण्याची विनंती केली असून त्यावर ठराविक कालावधीत कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी या तक्रारीच्या माध्यमातून दिला आहे. त्यांच्या या नव्या तक्रारीनंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख पुन्हा एकदा खिंडीत अडकले असून त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

एकीकडे सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी छायाचित्र व कागदोपत्री पुराव्यांद्वारे एकामागून एक तीन तक्रारी दाखल केलेल्या असतांना दुसरीकडे संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनीही त्यांचा कसूरी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सोपविला होता. त्याची चौकशी करण्यासाठी अधीक्षकांनी श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षकांना आदेशीतही केले होते. विशेष म्हणजे त्यांनी संगमनेरात येवून जवळपास तीन डझन ‘मान्यवरांचे’ जवाब नोंदविले खरे, मात्र त्यात वरीलप्रमाणे राजकीय घराण्याचे वलय असणार्‍यांचाच अधिक भरणा होता, त्यामुळे पोलीस उपअधीक्षकांचा कसूरी अहवालही पलटवण्याची तयारी पो.नि.देशमुख यांनी आपला वरदहस्त वापरुन केल्याची चर्चा यानिमित्ताने शहरात सुरु झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *