शिंदे-फडणवीस सरकारने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा! माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी; घटनेची जबाबदारी निश्‍चित होणं आवश्यक..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य सरकारच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघाताने अनेक भाविकांचा बळी गेला तर असंख्य नागरिक आजारी पडले आहेत. एप्रिलच्या मध्यात सूर्य आग ओकीत असतांनाही राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष करीत ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लाखों अनुयायांना कार्यक्रमासाठी बोलावले, मात्र त्यांच्यासाठी सावली, अन्न व पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने लाखोंने जमलेल्या समुदायातील अनेकांना उष्माघाताचा फटका बसून त्यांचा जीव गेला. या घटनेला राज्यातील शिंदे-फडणवीस यांचे सरकार जबाबदार असून त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.


गेल्या 16 एप्रिलरोजी राज्य सरकारने ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण‘ पुरस्कार प्रदान केला. सकाळी 10 वाजता नियोजित असलेल्या खारघरमधील या कार्यक्रमासाठी राज्यभरातून लाखों भाविक उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असतांनाही शासनाकडून कार्यक्रमस्थळी सावलीची मात्र व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे माध्यान्नाच्या ऊन्हाचा तीव्र चटका बसल्याने अनेकजण अत्यवस्थ झाले व त्यातील 13 जणांचा जीव गेल्याचे सरकारने जाहीर केले. मात्र सरकार मृतांचा आकडा लपवित असून या दुर्घटनेत कितीतरी अधिक निष्पाप भाविकांचा बळी गेल्याचा थेट आरोपही माजीमंत्री थोरात यांनी आज संगमनेरात आयोजित पत्रकार परिषदेतून केला.


यावेळी बोलतांना आमदार थोरात म्हणाले की, ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. त्यामुळे सदरील पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी त्यांना मानणारा मोठा वर्ग उपस्थित राहील हे सरकारला माहीती होते. त्यांच्या सुविधेसाठी राज्य सरकारने 13 कोटी रुपये खर्च करण्याचीही तयारी केली होती. मात्र इतक्या मोठ्या रकमेतून सरकारने केवळ महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वातानुकुलीत तंबू आणि शाही खानपानाची व्यवस्था केली. जमलेल्या लाखों नागरिकांना मात्र वार्‍यावर सोडून देण्यात आले. त्यातच सकाळी दहा वाजता सुरु होणारा कार्यक्रम दुपारी साडेअकरा वाजता सुरु होवून दुपारी दीड वाजता संपला. यावेळी सूर्य अक्षरशः आग ओकीत होता. वातावरणही सुमारे 43 अंशाच्या अधिक होते, मात्र सरकारने त्याचा विचार केला नसल्याचा आरोपही थोरात यांनी केला.


इतक्या प्रचंड उष्णतेत इतक्या मोठ्या संख्येने माणसं बोलवायचीच होती तर मग त्यांच्यासाठी सावलीची व अन्नपाण्याची व्यवस्था का केली गेली नाही असा सवाल उपस्थित करतांना त्यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या काहीजणांच्या शवविच्छेदनातून त्यांच्या पोटात अनेक तासांत अन्न व पाण्याचा एक कणही गेला नसल्याचे समोर आल्याचा दावाही केला. सरकार म्हणून नियोजन करतांना शिंदे-फडणवीस सरकारचा बेफिकीरपणा व निष्काळजीच नव्हेतर या सरकारची क्रूरताही स्पष्टपणे दिसून आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. या घटनेला राज्य सरकार पूर्णतः जबाबदार असून या गुन्ह्याचा पश्‍चाताप म्हणून नैतिकतेच्या आधारावर शिंदे-फडणवीस सरकारने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही माजीमंत्र्यांनी यावेळी केली.


पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी खारघर घटनेबाबत महाराष्ट प्रदेश काँग्रेसची भूमिका मांडतांना या घटनेची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी सरकारने तातडीने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. सरकारनेच आयोजित केलेल्या अशाप्रकारच्या एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांचे जीव जाण्याचा हा प्रसंग यापूर्वी कधीही घडलेला नसून सरकार त्यावरील चर्चेपासून पलायन करु शकत नाही, त्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावून त्यावर चर्चा करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Visits: 220 Today: 4 Total: 1106578

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *