चंदनापुरी घाटात टोमॅटोचा टेम्पो उलटल्याने चालक जागीच ठार! महामार्गावर टोमॅटोचा खच; मृतदेह काढण्यासाठी करावी लागली शर्थ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पूर्वी मृत्युघंटा म्हणून ओळखल्या जाणार्या चंदनापुरी घाटात अलिकडच्या काळात अपघातांची संख्या खुप कमी झाली आहे. संगमनेरहून पुण्याकडे जाणार्या या एकमेव महामार्गावरील चंदनापुरी घाट अत्यंत महत्त्वाचा आहे. या घाटात दुपारी दोनच्या सुमारास टोमॅटोने भरलेला आयशर टेम्पो पलटी झाला. सदर चालकाला आपल्या ताब्यातील वाहनाचा वेग नियंत्रित करता न आल्याने तो रस्तादुभाजकाला धडकून पलटी झाला. वाहनचालक गाडीखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनातील टोमॅटो महामार्गावर अस्ताव्यस्त पसरले होते. चालकाचा मृतदेह काढण्यासाठी महामार्ग पोलिसांना क्रेनची मदत घ्यावी लागली. यादरम्यान जवळपास तासभर एकाबाजूची वाहतूक रोखण्यात आली होती.

याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास नारायणगाव (जि.पुणे) येथून आयशर कंपनीचा टेम्पो (एम.एच.15, जी.व्ही.3198) टोमॅटो घेवून नाशिकच्या दिशेने निघाला होता. दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा टेम्पो चंदनापुरी घाटातील खिंडीच्या पुढे उतारावर असतांना वाहनचालकाचे नियंत्रण सुटले. त्यातच वाहनाला अधिक वेग असल्याने टेम्पोने रस्तादुभाजकाला जोराची धडक दिली व तो पुण्याच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर उलटला. दुर्दैवाने टेम्पोच्या खाली सापडून चालकाचा जागीच मृत्यू झाली. अपघातानंतर वाहनातील सगळे टोमॅटो रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्याने महामार्गावर लाल टोमॅटोचा खच पडला होता.

अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग विभागाचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनचालकाचा मृतदेह अपघातग्रस्त वाहनाच्या खाली फसल्याने तो काढण्यासाठी टोल नाक्यावरील क्रेन बोलवावी लागली. त्यानंतर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दरम्यान पुण्याकडे जाणारी वाहतुक खोळंबल्याने पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला नेईपर्यंत नाशिक बाजूने दोन्हीकडची वाहतुक वळवली होती. तासाभरानंतर वाहतुक सुरळीत करण्यात आली. यावेळी वाहनचालकाकडे कोणतेही ओळखपत्र न सापडल्याने महामार्ग पोलिसांनी वाहनाच्या क्रमांकावरुन त्यांच्या मालकाला फोन केला असता चालकाचे नाव विष्णु पांडुरंग उंबरे (वय 35, रा.गोरडगाव, ता.सिन्नर) असल्याचे समजले.

चंदनापुरी घाट म्हणजे मृत्युघंटा असा पूर्वी समज होता. अरुंद रस्ता आणि ऐन चढालाच नागमोडी वळणं यामुळे या घाटात नियमित अपघात व्हायचे. मात्र 2017 साली या महामार्गाचे नूतनीकरण झाल्यापासून किमान घाटात होणार्या अपघातांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 1990 च्या दशकात पुणे-अंमळनेर या बसचा ज्या ठिकाणी अपघात झाला होता, त्याच टप्प्यावरुन संगमनेरच्या दिशेने वेगवान उतार आणि काहीसा वळणदार रस्ता आहे. तेथेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण गमावले आणि त्याने ते पुन्हा नियंत्रित करण्यासाठी गरागरा स्टेअरिंग फिरविल्याने भरधाव वेगातील वाहनाने रस्तादुभाजकाला धडक दिली आणि तो पलिकडच्या बाजूला जावून उलटला. दुर्दैवाने त्याखाली सापडल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर रस्त्याने जाणार्या काही चारचाकी व दुचाकी चालकांनी थांबून वाहनचालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो वाहनाच्या खाली फसलेला असल्याने त्याला बाहेर काढण्यात अडचण येत होती. सूचना मिळताच काही वेळातच दाखल झालेल्या महामार्ग पोलिसांनीही चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र यश न आल्याने अखेर टोल नाक्यावरील क्रेन बोलावण्यात आली आणि चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

