जगाला सन्मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य रामकथेत : डॉ. कुमार विश्वास उद्योगपती राजेश मालपाणी अभीष्टचिंतन सोहळा; रामरसाने श्रोते मंत्रमुग्ध


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्याच्या काळात संपूर्ण जग संभ्रमावस्थेत सापडले आहे. माणसाचा हव्यास आणि लालसा वाढत आहे. हावरटपणामुळे एका रात्रीत श्रीमंत होण्याची विचित्र मानसिकता वाढीस लागली आहे, अशा कसोटीच्या वेळी वाममार्गाकडे झुकणार्‍या जगाला सन्मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य श्रीरामाच्या चरित्रात आहे. त्याचे अनुकरण केल्यास जगातील अनाचार नियंत्रणात येईल असे प्रतिपादन श्रीराम कथेचे मर्मज्ञ आणि विश्वविख्यात युगवक्ता डॉ. कुमार विश्वास यांनी केले.

उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित त्यांच्या ‘अपने अपने राम’ या रामकथेवर आधारित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, भाजपा नेते श्यामसुंदर जाजू, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, राजेंद्र पिपाडा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. विश्वास यांनी रामचरितमानसच्या आधारे प्रभू श्रीरामांच्या जीवनातील विविध अपरिचित प्रसंग मोठ्या ताकदीने उलगडून दाखवले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे श्रोत्यांच्या समोर रामायणातील प्रसंगांची चित्रे उभी राहिली.

यावेळी पुढे बोलताना डॉ. विश्वास म्हणाले की, रामायण हे कधीही कालबाह्य होणार नाही. प्रभू श्रीरामांनी दिलेली शिकवण ही स्वतःच्या वागणुकीतून दिली आहे, तो केवळ कोरडा उपदेश नाही. त्यामुळे राममार्ग हा त्रिकालबाधित सत्य आहे, अजरामर आहे. प्रभू श्रीरामांची शिकवण केवळ भारतभूमीपुरती मर्यादित नाही तर वैश्विक क्षितिजावर देखील ती अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभू रामचंद्रांचा त्याग, धैर्य, शौर्य, लोककल्याणकारी धोरण, पारिवारिक सुसंवाद इत्यादी गुणवैशिष्ट्यांचे त्यांनी सविस्तर विवेचनही यावेळी केले. त्यांच्या वक्तृत्वामध्ये हिंदी, इंग्रजी, संस्कृत भाषेतील विविध कविता व गीतांचे संदर्भ देण्याची पद्धत श्रोत्यांना थक्क करणारी होती. त्यांनी व त्यांच्या सहकारी वृंदांनी सादर केलेल्या विविध रचनांवर उपस्थित हजारो श्रोत्यांनी टाळ्यांचा ठेका धरला आणि जाणता राजा मैदान श्रीराम भजनाने दुमदुमून गेले होते. संत कबीरांचे दोहे त्यांच्या अर्थासह समजावून सांगताना त्यांनी जगणे म्हणजे काय याचे सविस्तर विवेचनही केले. सुमारे अडीच तासांच्या या कार्यक्रमात हजारो श्रोते देहभान विसरुन तल्लीन झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित श्रोत्यांना शिवकालात नेले. छत्रपतींच्या पराक्रमाचे विविध दाखले देताना निती आणि न्यायावर आधारित असलेल्या स्वराज्याची संकल्पनाही त्यांनी उलगडून सांगितली. शिवरायांच्या नसानसात राष्ट्रधर्म, स्वाभिमान आणि नितीचे पवित्र रक्त प्रवाहित करणार्‍या जिजामातेचेही त्यांनी यावेळी स्मरण केले.


उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या औद्योगिक प्रवासाचे वर्णन असलेल्या ‘ओपन सिक्रेट’ या पुस्तकाची कार्यक्रमस्थळी सवलतीच्या दरात विक्री सुरु आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत असून त्यातून मिळणारी संपूर्ण रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरली जाणार असल्याची घोषणा मालपाणी परिवाराच्यावतीने करण्यात आली. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा गजर करीत स्वागत केले.

Visits: 2 Today: 1 Total: 20799

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *