संगमनेरच्या ‘कर्तव्यम् फाऊंडेशन’ला रक्तमित्र पुरस्कार जाहीर शनिवारी नाशिक येथे होणार वितरण; सर्वच स्तरांतून अभिनंदन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील कर्तव्यम् फाऊंडेशन हे गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करण्याचे कार्य गेल्या सात वर्षांपासून करत आहे. या फाऊंडेशनला नाशिक येथील अर्पण थॅलेसेमिया सोसायटी आणि अर्पण रक्त केंद्र यांच्यावतीने रक्तमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण नाशिक येथे शनिवार दि. 14 मे, 2022 रोजी होणार आहे.

कर्तव्यम् फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुषार ओहरा यांच्या संकल्पनेतून गरजू रुग्णांना त्वरीत रक्त पुरवठा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. 2015 मध्ये या फाऊंडेशनची स्थापना झाली. त्यांनतर विविध ब्लड बँक तसेच हॉस्पिटल यांच्या रक्तासाठी मागणी होवू लागली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गरजू रुग्णांना कर्तव्यम् फाऊंडेशनने रक्त पुरविले आहे. त्याचबरोबर दिल्ली, हैद्राबाद , गुजरात याठिकाणी देखील अनेक रुग्णांना रक्त पुरवठा केला आहे. या कार्याची दखल घेत नाशिक येथील अर्पण थॅलेसेमिया सोसायटी आणि अर्पण रक्त केंद्र यांच्यावतीने रक्तमित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास सुनीता बोहरा (अध्यक्ष, जीतो लेडीज विंग, जीतो अ‍ॅपेक्स, मुंबई.), चिन्मय उदगीरकर (सुप्रसिद्ध अभिनेता), डॉ. नीलेश वासेकर (सुप्रसिद्ध हेमॅटोलॉजिस्ट), डॉ. सिद्धेश कलंत्री (सुप्रसिद्ध हेमॅटोलॉजिस्ट), डॉ. एन. के. तातेड (अध्यक्ष, अर्पण थॅलेसेमिया सोसायटी), डॉ. अतुल जैन (सचिव, अर्पण थॅलेसेमिया सोसायटी), डॉ. वर्षा उगावकर (कार्यकारी संचलिका, अर्पण थॅलेसेमिया सोसायटी), नाशिक अर्पण ब्लड बँकेचे व्यवस्थापक आर. के. जैन व संगमनेर अर्पण बँकेच्या व्यवस्थापक प्रमिला कडलग उपस्थित राहणार आहेत.

गेल्या सात वर्षांपासून कर्तव्यम फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये रुग्णांना आवश्यक असणार्‍या कोणत्याही रक्तगटाच्या रक्तपिशव्यांचा पुरवठा केला जातो. एक मिशन म्हणून काम करणार्‍या या ध्येयवेड्या तरुणांनी अवघ्या सात वर्षांच्या कालावधीत सुमारे 8 हजारांहून अधिक रक्तपिशव्या उपलब्ध करुन तितक्याच रुग्णांचे प्राण वाचवले आहे. कोविड संक्रमणाच्या काळातही फाऊंडेशनने प्लाझ्मा संकलन मोहीम राबवून जवळपास चारशे पिशव्यांचे संकलन केले होते. त्यांना आता प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्हाभरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Visits: 99 Today: 1 Total: 1114497

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *