कोपरगावचे दोन नगरसेवक कायमस्वरुपी अपात्र घोषित उपमुख्याधिकार्‍यांना मारहाण प्रकरण; जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
येथील नगरपरिषदेचे तत्कालीन उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना मारहाण करून कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी दाखल याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्यात माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व माजी नगरसेवक कैलास द्वारकानाथ जाधव यांना कायमस्वरूपी अपात्र घोषित केल्याचा निकाल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला असल्याची माहिती अ‍ॅड. विद्यासागर शिंदे यांनी दिली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना अ‍ॅड. विद्यासागर शिंदे म्हणाले, कोपरगावचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी तत्कालीन मुख्याधिकारी डोईफोडे यांनी दिलेल्या आदेशानुसार व शासनाच्या नियमानुसार कोपरगाव शहरातील अतिक्रमणे नियमाप्रमाणे काढली होती. त्याचा राग धरून माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल व नगरसेवक कैलास जाधव यांनी कार्यकर्त्यांसह पालिका कार्यालयात जाऊन उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली होती. तसेच नगरपरिषद कार्यालयातील बांधकाम विभागाचे अभियंता दिगंबर वाघ यांनाही शिवीगाळ करत कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी 1965 चे कलम 44 नुसार कायदेशीर गुन्हा सुनील जनार्दन फंड व हेमंत यशवंत ढगे यांनी केलेल्या अर्जावरून दाखल करण्यात आला होता.

यावर दोन्ही बाजूच्या युक्तीवाद ऐकून, सीसीटीव्ही फुटेज, फिर्यादीचे जबाब व मुख्याधिकार्‍यांचा गुप्त अहवाल या सर्वांची पडताळणी करून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास द्वारकानाथ जाधव यांच्यावर झालेल्या आरोपांनुसार दोषी धरत कायमस्वरूपी अपात्र घोषित करण्यात आल्याचा अंतिम निकाल दिला आहे. या निकालाने कोपरगावात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव पालिकेच्या कार्यालयात तोडफोड करून बांधकाम अभियंता व उपमुख्याधिकार्‍यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण करणार्‍या नगरसेवकांविरुद्ध अपात्रतेची कारवाई व्हावी म्हणून जिल्हाधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली होती. याचा उद्देश एवढा होता की पालिकेतील अधिकार्‍यांवर दहशत व दमबाजी होऊ नये. आजी-माजी नगरसेवकांनी भविष्यात असे कृत्य करू नये व या दोन्ही नगरसेवकांना चपराक बसावी.
– सुनील फंड, याचिकाकर्ते

Visits: 6 Today: 2 Total: 23139

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *