अण्णा हजारे वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात मैदानात 14 फेब्रुवारीपासून राळेगणसिद्धीमध्ये उपोषणाचा इशारा

नायक वृत्तसेवा, नगर
किराणा दुकानांतून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचे अस्त्र उगारलं आहे. येत्या 14 फेब्रुवारीपासून राळेगणसिद्धी येथे ते उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारला दुसरे समरण पत्र पाठवून त्यांनी तारीख जाहीर केली आहे.

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयास अण्णा हजारे यांनी आधीच विरोध केला होता. तसंच, त्या संदर्भात पत्रही लिहिलं होतं. मात्र, सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना लक्षात घेऊन आम्ही या निर्णयावर आलो आहोत. लवकरच राज्यातील विविध सामाजिक संघटनांच्या समविचारी कार्यकर्त्यांची एक बैठक राळेगणसिद्धी येथे घेण्यात येणार आहे. त्यावेळी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी जनतेची मागणी आहे. अन्यथा मला 14 फेब्रुवारीपासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करावे लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

आमच्या संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून आमच्या साधूसंतानी, राष्ट्रीय महापुरुषांनी अतोनात प्रयत्न केला. दुकानांमध्ये वाईन आली तर ही संस्कृती धुळीला मिळेल आणि चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढीला लागेल. त्यातून काय काय अनर्थ घडतील सांगता येत नाही. ती अधोगतीकडे नेणारी संस्कृती पहायला नको म्हणून 14 फेब्रुवारी रोजी मी राळेगणसिद्धीमध्ये श्री संत यादवबाबा मंदिरात उपोषण करीत आहे, असं अण्णांनी सरकारला पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे. वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत राज्य सरकारला दोनवेळा पत्र पाठवण्यात आलं आहे. लोकायुक्त मसुदा समितीच्या बैठकाही टाळण्यात येत आहेत. त्यासंबंधीही काही दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला आहे. मात्र राज्य सरकारकडून एकाही पत्राचं उत्तर आलेलं नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्या एकाही पत्राला कधीच उत्तर देत नाहीत. पण आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडूनही तसेच घडताना दिसत आहे. मी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांना कधीही वैयक्तिक विषयावर पत्र लिहिलेले नाही. व्यापक सामाजिक हिताच्या प्रश्नांवरच मी पत्र लिहित असतो. तरीही त्याचे उत्तर देणे टाळले जात असेल तर सरकारला जनतेच्या हिताशी काही देणेघेणे आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो, असा त्रागा अण्णांनी व्यक्त केला आहे.

Visits: 157 Today: 1 Total: 1101635

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *