संगमनेर शहर व तालुक्याला कोणते निरीक्षक लाभणार? बदल्यांना पुन्हा महिन्याभराची मुदतवाढ मिळाल्याने शिळ्या कढीला आला नव्याने ऊत


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या पोलिसांच्या बदल्यांना पुन्हा एकदा महिन्याभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना काही दिवसांचा दिलासा मिळाला आहे. या कालावधीत त्यांना ‘ऐच्छिक’ ठिकाणासाठी धावपळ करण्याचीही संधी मिळाल्याने शुक्रवारी मुदतवाढीचे आदेश मिळताच काही अधिकारी ‘रजेवर’ गेले आहेत. संगमनेर शहर अथवा तालुका पोलीस ठाणे मिळावे यासाठी जिल्ह्यातील अनेक वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले असून गेल्या कालावधीत मोठ्या अधिकार्‍यांपासून मर्जीतल्या मंत्र्यांच्याही भेटीगाठी झाल्या आहेत. मात्र आताच्या बदल्या पोलीस महासंचालकांच्या पातळीवरुन होणार असल्याने तालुक्याच्या चारही पोलीस ठाण्यात कोण कोणत्या प्रभारी अधिकार्‍यांची वर्णी लागणार याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.


शासनाच्या नियमानुसार दरवर्षी फेब्रुवारी ते जून या कालावधीत राज्यातील शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियमितपणे बदल्या होत असतात. यंदाच्यावर्षी मात्र नेमक्या बदल्यांच्या वेळीच देशासह राज्यात कोविडचा प्रवेश झाल्याने जाणकार अधिकार्‍यांच्या बदल्यातून राज्यातील ठिकठिकाणची परिस्थिती बिघडू नये यासाठी त्यांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील शहर, ग्रामीण, घारगाव व आश्वी या चारही पोलीस ठाण्यांच्या प्रभार्‍यांना ऐच्छिक बदलीसाठी भेटीगाठी घेण्यास मोठा कालावधी मिळाला.


संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांना नगरची स्थानिक गुन्हे शाखा हवी आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासूनच मोठी फिल्डिंग लावून ठेवली असून राजकीय व प्रशासकीय पातळीवरुन आपल्या नावाचा दबाव निर्माण केला आहे. तर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील संगमनेर शहरासाठी उत्सुक असून ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत यासाठी त्यांनी मोठी शिकस्त केल्याचे समजते. मात्र शहर पोलीस ठाण्यासाठी त्यांचा विचार झालेला नसल्याचे समजते. संगमनेर शहर पोलीस ठाणं न मिळण्यामागे वाळु तस्करीतून गेल्या 28 जूनरोजी देवगावजवळ झालेला अपघात आणि त्यात गेलेला तिघांचा बळी त्यांना आडवा आल्याची चर्चा आहे.


तर थेट पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्त्वाखाली येणार्‍या अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षकपद आपल्या पदरात पडावे यासाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांनी गेल्या कालावधीत मोठे परिश्रम घेतले आहेत. आता या परिश्रमांचे चांगले-वाईट फळ मिळण्याची प्रतीक्षा असतानाच शासनाने पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या ‘महत्त्वकांक्षी’ अधिकार्‍यांना आपल्या ‘ऐच्छिक’ बदलीसाठी पुन्हा एकदा शेवटचा ‘भिम’ प्रयत्न करण्याची संधी मिळाली आहे, या संधीचा नेमका कोणाला लाभ होतो याची उत्सुकता मात्र ताणली गेली आहे.

संगमनेर शहर व तालुका पोलीस ठाणी ‘क्रिम’ समजली जातात. ही पोलीस ठाणी मिळवण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांमध्ये मोठी चढाओढ लागलेली असते. सद्यस्थितीतही संगमनेरात आपली वर्णी लागावी यासाठी जिल्ह्यातीलच अन्य पोलीस ठाण्यांचा पदभार असलेल्या अर्धा डझनहून अधिक अधिकार्‍यांनी काही मंत्री, नेते व अधिकार्‍यांचे उंबरेही पुजल्याची माहिती आहे. पण यापूर्वी संगमनेर तालुका व नंतर काहीकाळ शहर पोलीस ठाण्याचा अनुभव असलेल्या एका वरीष्ठ पोलीस निरीक्षकांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. त्यांच्या नावावर संगमनेरच्या नेतृत्त्वानेही शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. मात्र शहर व तालुका पोलीस ठाण्यांच्या सध्याच्या प्रभार्‍यांच्या ‘ऐच्छिक’ बाबत मात्र कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

Visits: 100 Today: 1 Total: 1114074

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *