जिल्ह्यात धुडगूस घालणार्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफार्श! संगमनेर पोलिसांची दमदार कारवाई; दोन लाखांचे दागिनेही केले हस्तगत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या मोठ्या कालावधीपासून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दित धुमस्टाईल महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविणार्या टोळीचा पर्दाफार्श करण्यात संगमनेर पोलिसांना यश आले आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली असून त्यांच्या चौकशीतून आणखी दोघा कुख्यात चोरट्यांची नावे समोर आली आहेत. त्यातील एकावर अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात मिळून तब्बल 18 गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत पोलिसांनी दोघांकडून दोन लाखांच्या दागिन्यांसह 20 हजार रुपये किंमतीची पल्सर मोटार सायकलही हस्तगत केली आहे. गेल्या काही वर्षात एकाच टोळीकडून इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे उघड होण्याची जिल्ह्यातील बहुधा ही पहिलीच कारवाई असल्याने संगमनेर पोलिसांचे कौतुक होत आहे.

गेल्या 5 फेबु्रवारीरोजी स्टेट बँकेजवळून जात असतांना सुनिता भागवत रहाणे या महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे व 60 हजार रुपये सरकारी किंमत असलेले सोन्याचे गंठन चोरट्यांनी धुमस्टाईल लांबविले होते. या प्रकरणाचा तपास खुद्द संगमनेरचे उपअधीक्षक राहुल मदने यांनी स्वतःकडे घेत जिल्ह्यातील अन्य घटनांसह या प्रकरणाची पडताळणी करीत पुराव्यांची जुळवाजुळव केली असता त्याच दिवशी लोणी येथेही असाच प्रकार घडल्याची माहिती त्यांना मिळाली. तेथील उपलब्ध सीसीटीव्ही फूटेजमधून संगमनेर आणि लोणीतील घटना एकाच टोळीतील दोघांनी केल्याचा निष्कर्ष काढून त्यांनी त्यादृष्टीने तपास केला असता श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील योगेश सिताराम पाटेकर याचे नाव समोर आले.

विशेष म्हणजे याच दिवशी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूरात कारवाई करीत वडाळा महादेव मधील एकासह अशोक नगरमधील एकाला अटक केली. त्यांच्या चौकशीतूनही योगेश पाटेकर याचे नाव समोर आले, त्यानंतर गुन्हे शाखेने त्याच्या अटकेसाठी वडाळा महादेवसह अन्य काही ठिकाणी छापेही घातले, मात्र नेमके त्याचवेळी तो लोणी आणि संगमनेरातील स्टेट बँकेजवळ आणखी गुन्हे करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे आता संगमनेर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. उपअधीक्षक मदने यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने या टोळीतील मुख्य सूत्रधार योगेश सिताराम पाटेकर (वय 21) व नागेश उर्फ नाग्या राजेंद्र काळे (वय 20, दोघेही रा.वडाळा महादेव) यांना अटक केली आहे.

योगेश पाटेकर हा सराईत चोरटा असून त्याने संदीप दादाहरी काळे (रा.श्रीरामपूर) व लहु बबन काळे (रा.नाशिक) यांच्यासोबत जिल्ह्यातील भिंगार कॅम्प, कोतवाली, संगमनेर तालुका व शहर, श्रीरामपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दित प्रत्येकी एक तर नाशिक आयुक्तालयाच्या क्षेत्रात दोन गुन्हे केले आहेत. यातील संदीप काळेला गेल्या 5 फेब्रुवारीरोजी गुन्हे शाखेने पकडले असून सध्या तो भिंगार पोलिसांच्या ताब्यात आहे. तर लहु काळे मात्र अद्यापही पसार आहे. चालत्या वाहनावरुन महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडण्यात अतिशय माहीर असलेल्या पाटेकरने दुसर्या टोळीतील नागेश काळे, विनोद उर्फ खंग्या विजय चव्हाण (रा.अशोकनगर) व ऋषी जाधव (रा.सुतगिरणी. ता.श्रीरामपूर) यांच्यासोबत एकूण सहा गुन्हे केले असून त्यातील सर्वाधीक चार गुन्हे संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित आहेत.

याशिवाय या टोळीने लोणी व नाशिक आयुक्तालयाच्या हद्दित प्रत्येकी एक गुन्हा केला आहे. यातील मुख्य सूत्रधार योगेश पाटेकरसह नागेश राजेंद्र काळे पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून विनोद उर्फ खंग्या विजय चव्हाण व ऋषी जाधव पसार झाले आहेत. या दोघांतील विनोद चव्हाण हा अतिशय सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात सहा, तोफखाना पोलीस ठाण्यात चार, शिर्डी पोलीस ठाण्यात तीन, संगमनेर शहर व राहुरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन तर कोपरगाव पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद आहे.

या संपूर्ण तपासातून पोलिसांनी संगमनेर हद्दितील सात गुन्हे उघड केले असून 5 फेब्रुवारीरोजी स्टेट बँकेजवळ घडलेल्या घटनेतील मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी अजूनही तपास सुरु असून उर्वरीत गुन्ह्यातील ऐवज हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या कारवाई दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील. अप्पर अधीक्षक स्वाती भोर यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.अण्णासाहेब दातीर, फुरकान शेख (श्रीरामपूर), पो.कॉ.अमृत आढाव, सुभाष बोडखे (दोघेही संगमनेर शहर) व प्रमोद गाडेकर (घारगाव) यांनी ही मोहीम फत्ते केली. आरोपींना शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पंकज जाधव व निवांत जाधव अधिक तपास करीत आहेत. संगमनेर पोलिसांनी बजावलेल्या या कारवाईचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

