योगासन क्रीडा प्रकारातून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत ः डॉ.मालपाणी
योगासन क्रीडा प्रकारातून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत ः डॉ.मालपाणी
संगमनेर महाविद्यालयाच्यावतीने डॉ.संजय मालपाणी यांचा निवडीबद्दल सत्कार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
योग साधना ही एक जीवनशैली असून, त्यातून मानवी जीवन निरोगी व समृद्ध होण्यास मदत होते. काळाची पाऊले ओळखत योगसाधनेतून योगासन या क्रीडा प्रकारातून आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम खेळाडू निर्माण होतील असा विश्वास राष्ट्रीय योगासन खेल महासंघाचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी व्यक्त केला.

संगमनेर महाविद्यालयात आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करताना बोलत होते. याप्रसंगी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, सचिव डॉ.अनिल राठी, जनरल सेक्रेटरी सीए.नारायण कलंत्री, खजिनदार राजकुमार गांधी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.मालपाणी म्हणाले, 21 जून हा दिवस संपूर्ण विश्वात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर योगासन हा क्रीडा प्रकार म्हणून ओळखला जावा आणि जास्तीत-जास्त तरुणांनी योगासन खेळाच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधीत्व करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, सीए.नारायण कलंत्री, जसपाल डंग, नरेंद्र चांडक यांनी आपल्या मनोगतातून डॉ.मालपाणी यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ.गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना ‘कर्मण्येवाधकिारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोसत्वकर्मणि’ या कृतीतून जगणारे आधुनिक काळातील दधिची म्हणून डॉ.मालपाणी यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. सूत्रसंचालन विजय पाटील यांनी तर उपप्राचार्य डॉ.राजेंद्र लढ्ढा यांनी आभार मानले. याप्रसंगी अनिल सातपुते, संतोष करवा, रवींद्र पवार आदी संस्थेचे पदाधिकारी, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल देशमुख, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.राजेंद्र ढमक, उपप्राचार्य डॉ.रवींद्र ताशिलदार, प्रबंधक संतोष फापाळे, प्राध्यापक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.

