अपहरण झालेल्या मुलीला काही तासांतच केले आईच्या स्वाधीन! श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी; नागरिकांतून होतोय कौतुकाचा वर्षाव

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील हरेगाव फाटा ठिकाणावरून एका तरुणाने पाचवर्षीय सावत्र बहिणीस फूस लावून पळवून नेले होते. मात्र कुठलाही पुरावा, मोबाईल संपर्क तसेच धागेदोरे नसतानाही श्रीरामपूर शहर पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत अपहरण झालेली मुलगी काही तासांतच वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आईच्या स्वाधीन केली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.

श्रीरामपूर हरेगाव फाटा तालुक्यातील परिसरातील झोपडी याठिकाणावरून गणेश अशोक घाडगे या तरुणाने स्वतःची सावत्र बहीण (वय 5) या छोट्या बालिकेस फूस लावून पळवून नेले. मुलीची आई झोपडीमध्ये आल्यावर मुलगी घरात नाही तसेच सावत्र मुलगा गणेश अशोक घाडगे हा देखील दिसत नसल्याने महिलेने परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यानंतर या महिलेने हरेगाव फाटा पोलीस निवारा कक्ष याठिकाणी माहिती दिली. यावरून पोलीस नाईक किरण पवार यांनी घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप तसेच पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांना दिली. पोलीस नाईक किरण पवार तसेच पोलीस मित्र गणेश गायकवाड यांनी वैजापूर, कोपरगाव येथे माहिती घेतली. सदर तरुणाकडे मोबाईल नसल्याने तपासामध्ये मोठी अडचण निर्माण होत होती.

येथील गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई यांनी मोबाईलवरून सदर तरुणाचे मुलीचे गाडीचे फोटो व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रसार माध्यमांमधून सर्वत्र पाठवले. यावेळी आरोपी हा कोपरगाववरुन नाशिककडे जात असताना पोलिसांना माहिती मिळाली. तसेच नाशिककडे जात असताना तरुणाची गाडी नाशिक जिल्ह्यातील वावी पांगरी याठिकाणी बंद पडल्याने त्याने गाडी रस्त्यावर उभी करून मुलीस गाडीजवळ बसविले व त्याठिकाणावरून त्याने अन्य वाहनाने नाशिककडे पलायन केले. या अवस्थेमध्ये रस्त्यावर मुलगी रडत असल्याने पांगरी येथील पोलीस मित्र शांताराम वारुळे यांनी मुलीबाबत चौकशी करत घरी नेऊन जेऊ घातले. या घटनेची माहिती पत्रकार शंतनू कोरडे यांना देण्यात आली. यावेळी मोबाईलवर सदर तरुणाबाबत असलेली माहितीची पडताळणी झाली. यावरुन पत्रकार कोरडे यांनी हरेगाव फाटा पोलीस निवारा कक्ष येथे संपर्क केला. यावरून पोलीस शिपाई तुषार गायकवाड, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई आणि अपहरण झालेली मुलीची आई मुलीला घेण्यासाठी पांगरी याठिकाणी पोहोचले. येथे सापडलेली पाचवर्षीय लहान मुलगी ताब्यात घेत आईच्या स्वाधीन केली. मुलीला पाहताच आईच्या जिवात जीव आला. यावेळी श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस मित्र शांताराम वारुळे, पत्रकार शंतनू कोरडे यांचे आभार मानण्यात आले. तर शहर पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत अपहरण झालेली मुलगी काही तासांतच वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आईच्या स्वाधीन केली. यावेळी सरपंच आबासाहेब गवारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी पोलीस नाईक किरण पवार, पोलीस शिपाई तुषार गायकवाड, राजेंद्र देसाई, पोलीस मित्र गणेश गायकवाड, बनकर यांचे कौतुक करत सन्मान करणार असल्याची माहिती दिली.

Visits: 115 Today: 2 Total: 1105658

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *