राहाता तालुक्यात अतिवृष्टीने पिके उध्वस्त; सोयाबीनला फुटले मोड
राहाता तालुक्यात अतिवृष्टीने पिके उध्वस्त; सोयाबीनला फुटले मोड
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन आर्थिक मदतीची शेतकर्यांची मागणी
नायक वृत्तसेवा, राहाता
गोदावरी उजवा कालवा लाभक्षेत्रात व राहाता तालुक्यात गेल्या पाच-सात दिवसांपासून सातत्याने दररोज सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, चारा पिके व फळबागांना मोठा फटका बसला असून नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनला तर अक्षरशः मोड फुटले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे शासनाने तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्यांतून जोर धरु लागली आहे.

राहाता तालुक्याला वरदान ठरलेल्या गंगापूर, दारणा धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस पडत आहे. गोदावरी खोर्यातील दारणा, गंगापूर धरण समूहातील सर्वच छोटी-मोठी धरणे जवळपास शंभर टक्के भरली आहे. यामध्ये मुकणे धरणाचा अपवाद आहे. मुकणे धरण भरण्यास अद्याप दीड दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकता आहे. सध्या दारणा धरणाचा पाणीसाठा 7 हजार 149 दलघफू, गंगापूर 5 हजार 614 दलघफू, मुकणे 6 हजार 23 दलघफू, वालदेवी 1 हजार 133 दलघफू, कश्यपी 1 हजार 348 दलघफू, कडवा 1 हजार 688, गौतमी गोदावरी 1 हजार 607 दलघफू, आळंदी 888 दलघफू, भावली 1 हजार 434 दलघफू, भाम 2 हजार 464 दलघफू, वाकी 2 हजार 265 दलघफू, पालखेड 633 दलघफू झाला आहे. तर दारणा धरणातून नदीपात्रात 750 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोर्यातील जवळपास सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीवरील नांदूर मधमेश्वर जलाशयात एकत्रित होत असून या जलाशयातून गोदावरी नदीपात्रात 12 हजार 105 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सद्यस्थितीत गोदावरीचे उजवा व डावा हे दोन्ही कालवे बंद आहे. रविवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या चोवीस तासांत गोदावरी खोर्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात इगतपुरी 27 मिलीमीटर, घोटी 31 मिलीमीटर, भावली 12 मिलीमीटर, दारणा 45 मिलीमीटर, त्र्यंबक 3 मिलीमीटर, अंबोली 11 मिलीमीटर, गंगापूर 35 मिलीमीटर, मुकणे 15 मिलीमीटर व नाशिक 25 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तर राहाता तालुक्यात आजपर्यंत 927 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील गेल्या चोवीस तासांत (कंसात आजपर्यंत) सोमठाणा 150 मिलीमीटर (682), सोनेवाडी 51 मिलीमीटर (499), कोळगाव 30 मिलीमीटर (646), शिर्डी 45 मिलीमीटर (678), राहाता 34 मिलीमीटर (927), रांजणगाव 43 मिलीमीटर (753) व चितळी 88 मिलीमीटर (839) पाऊस नोंदला गेला आहे. खाली औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवर मराठवाड्यासाठी बांधलेल्या 102 टीएमसी क्षमतेच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 101 टीएमसीपेक्षा पेक्षा अधिक झाला आहे. जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे दोन ते चार फुटांनी उघडण्यात आले असून या धरणातून शुक्रवार व शनिवारी एक लाख क्युसेक वेगाने पाणी गोदावरीत सोडण्यात आले होते. रविवारी पाण्याची आवक कमी झाल्याने जायकवाडीचा विसर्ग 66 हजार 24 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे.
![]()
परंतु, वरुणराजाचा यंदाचा मूड काही औरच असल्याने सातत्याने बरसात होत असल्याने पिके उध्वस्त झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास ऐन कोरोनाच्या संकटात हिरावून नेला आहे. उभ्या पिकांत पावसाचे पाणी साचल्याने पिके सडू लागली आहेत. यामुळे आधीच कोरोना संकटामुळे पिचलेल्या शेतकर्यांना वरुणराजाने दुहेरी झटका दिला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्यांची दखल घेत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकर्यांतून जोर धरु लागली आहे.

