श्रीरामपूर पोलीस ठाण्यात पुन्हा लाचखोरी! दोघा भावांच्या भांडणात पंधरा हजारांची मागणी; दोघे जाळ्यात

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
अवैध धंदे आणि गुन्हेगारांचे आगार समजले जाणारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे पुन्हा एकदा लाचखोरीच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. यावेळी दोन भावांमध्ये भिंतीवरुन सुरु असलेल्या वादात प्रत्यक्ष बांधकाम स्थळी उपस्थित राहून मदत करणे आणि दुसर्या भावाला धाक दाखवून आवश्यक ते सहकार्य करण्याच्या बदल्यात पंधरा हजारांची लाच मागणार्या पोलीस हवालदारासह एका शिपायाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईने जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्यावर बदलीची तलवार लटकू लागली आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर शहरातील दोघा भावांमध्ये भाऊबंदकीचा वाद सुरु आहे. त्यातून एकाने बांधकाम काढल्याने दुसर्याने त्याच्या भिंतीवर आक्षेप घेत त्यात अडथळा निर्माण केला. त्यामुळे बांधकाम बंद पडलेल्या भावाने पोलिसांची मदत घेण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील हवालदार सुनील उत्तमराव वाघचौरे व शिपाई गणेश हरी ठोकळ यांची मदत मागितली. मात्र या दोघांनी त्या बदल्यात संबंधिताकडून 15 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते.

त्यानुसार गुरुवारी (ता.27) पैसे देण्याचे ठरले, दरम्यान तक्रारदाराने याबाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार ठरलेल्यावेळी व ठिकाणी विभागाने सापळ्याची रचना करुन तक्रारदाराला पंचांसोबत पाठविले असता त्यांच्याकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारतांना वरील दोन्ही पोलीस कर्मचार्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदरच्या कारवाईत विभागाच्या पोलीस निरीक्षक साधना इंगळे, हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे व पोलीस नाईक गिते यांचा सहभाग होता. या कारवाईने श्रीरामपूर पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले असून एकाचवेळी दोन लाचखोर पकडले गेल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

विविध प्रकारचे अवैध धंदे आणि गुन्हेगारांचे वास्तव्य यामुळे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे नेहमीच चर्चेत असते. आता त्यात दोघा लाचखोरांची भर पडल्याने या पोलीस ठाण्यातील अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यापूर्वी जिल्ह्यात अशा पद्धतीच्या लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या प्रभार्यांना मुख्यालयाचा रस्ता दाखविला आहे. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तर एकाचवेळी दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्यावर कोणत्या स्वरुपाची कारवाई होते याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राज्यात सर्वाधिक लाचखोर विभाग म्हणून पहिल्या क्रमांकावर महसूल तर दुसर्या क्रमांकावर पोलीस खाते समजले जाते. जिल्ह्यातही गेल्या काही महिन्यांमध्ये या दोन्ही विभागातील डझनावर अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाया झाल्या आहेत. ठराविक कालावधीत अशा प्रकारच्या कारवाया समोर येत असल्या आणि सापळा अधिकार्यांकडून कारवाई दरम्यान आवश्यक पुराव्यांची जुळवजुळव होत असली तरीही प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारचे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण मात्र नगण्य आहे. त्यामुळे कारवाई झालेल्या कर्मचार्यांचे पुढे काय होते याबाबत समाज मात्र आजही अनभिज्ञ असल्याची अवस्था आहे.

