भंडारदरा परिसरात ‘बीएसएनएल’च्या नेटवर्किंगचा उडाला बोजवारा अनेक विद्यार्थ्यांनाही नाईलाजास्तव बसावे लागले नापासाच्या पंक्तीत

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या भंडारदरा परिसरात भारत संचार निगम लिमिटेडच्या (बी. एस. एन. एल.) नेटवर्किंग सेवेचा बोजवारा उडाला आहे. यामुळे ही सेवा पर्यटनावर आधारित असणार्‍या व्यावसायिकांसाठी ‘असून अडचण, बसून खोळंबा’ ठरत आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा हे पर्यटनाचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे. या पर्यटनावर स्थानिक बांधवांना चांगल्याप्रकारे रोजगार निर्मिती होऊ लागली आहे. त्यातच भंडारदर्‍याला आता बाराही महिने पर्यटक भेट देऊ लागले आहेत. येथील कळसूबाई शिखर, आशिया खंडातील सर्वात खोल सांदण दरी, ब्रिटीशकालीन भंडारदरा धरण, छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते ठिकाण रतनगड तर भाविकांचे श्रद्धास्थान असणारे अमृतेश्वराचे देवालय ही पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. वन्यजीव विभागाच्या अभयारण्यात कापडी तंबूचा व्यवसाय हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

सदर व्यवसाय भंडारदरा धरणाच्या पाणवठ्याजवळ, सांदणदरी परिसरात, कळसूबाईच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात चालत असतो. त्यासाठी आदिवासी तरुण व्यावसायिकांनी खर्च करुन संकेतस्थळ (वेबसाईट) खोलत कापडी तंबू (टेंट) व्यवसायाची जाहिरात मोठ्या प्रमाणात केलेली असल्याने याची नोंदणी सुद्धा संकेतस्थळावरुनच होत असते. या परिसरातील बी. एस. एन. एलची सेवा चांगल्याप्रकारे कार्यरत आहे. पंरतु गत सहा – सात महिन्यांपासून या सेवेचा बोजवारा उडाला आहे. महिन्यातील पंधरा दिवस सुद्धा सेवा सुरळीत देण्यात बी. एस. एन. एल. कंपनी कमी पडत आहे. त्यामुळे ‘एक महिन्याचे रिचार्ज मारा व पंधरा दिवस सेवा मिळवा,’ ही नवीन योजना तर या कंपनीने राबविली नाही ना? हा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. नेटवर्किंगमध्ये सातत्य नसल्याने टेंट व्यवसायाच्या, हॉटेल बुकींगच्या समस्येत वाढ झाली आहे. यामुळे आदिवासी तरुण व्यावसायिकांच्या रोजगारावरच संकट ओढावले आहे.

कोविड संकटात विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था शासनाने केली. भंडारदरा धरणाच्या परिसरात बी. एस. एन. एलची सेवा कायमच ठेंगा दाखवत असल्याने अनेकांना या ऑनलाईन शिक्षण सेवेचा फायदाच घेता आला नाही. परिणामतः अनेक विद्यार्थ्यांना नापासाच्या पंक्तीत नाईलाजास्तव बसावे लागले.

Visits: 172 Today: 2 Total: 1098166

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *