संगमनेरात अवतरली ‘देवमामलेदारां’ची कचेरी! तहसीलदार निकम यांचा उपक्रम; कार्यालयीन भिंतीही करणार आता प्रबोधन..
श्याम तिवारी, संगमनेर
सामान्य शेतकरी आणि महसूल विभागाची तहसिल कचेरी यांचा खुप जवळचा संबंध आहे. मात्र अनेक प्रसंगात माहितीच्या अभावाने सामान्यांना येथील कामकाजाची दिशा लक्षात येत नाही. त्याचा गैरफायदा घेवून काही संधीसाधूंकडून त्यांना लुबाडण्याच्याही घटना घडतात. खरेतर भारतात महसूल विभागाची रचना निजामशाहीत मलिक अंबरने केल्याचे सांगितले जाते. त्यानंतरच्या राजवटींनी त्यात वेळोवेळी सुधारणाही केल्या. एकोणीसाव्या शतकात बागलाण तालुक्याचे मामलेदार म्हणून रुजू झालेल्या यशवंत भोसेकर यांनी आपल्या कामातून देवत्त्व प्राप्त केले. स्वातंत्र्योत्तर काळात या सर्व कामकाजात अमुलाग्र बदल झाले, त्यातून वेळोवेळी समोर आलेल्या सुधारणाही स्वीकारल्या गेल्या. मात्र त्याची दीर्घकाळ अंमलबजावणी न झाल्याने या विभागात आजही सुधारणांना वाव आहे. हाच धागा पकडून राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विभागाच्या कामकाजात विविध बदल घडवून महसूलमधील सामान्यांची परवड दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. संगमनेरच्या तहसिलदारांनीही त्यांना त्याच तोडीची साथ देतांना त्यांचा प्रत्येक महत्त्वकांक्षी निर्णय ताकदीने राबविण्यासह कार्यालयीन कामासाठी येणार्या अभ्यागतांचे प्रबोधन करण्याचाही अभिनव प्रयोग राबविला आहे. त्यांच्या या प्रयोगातून तहसिल कार्यालयाच्या भिंतीही आता कामासाठी येणार्यांशी संवाद साधणार आहेत.
शासकीय कार्यालयात येणार्या अभ्यागतांना शासन आपले वाटावे यासाठी राज्य सरकारने ‘सुंदर माझे कार्यालय’ हे अभिनव अभियान राज्यात सुरु केले. त्या अनुषंगाने संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी कालबद्ध योजना आखून तहसिल कार्यालयाचे आवार पोलिसांनी जप्त केलेल्या, वाळु तस्करीत सापडलेल्या वाहनांच्या गर्दीतून मुक्त केले. या संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबवून तहसिलचा परिसर चकाचक केला. त्याही पुढे जात त्यांनी कार्यालयीन इमारतीच्या भिंतींवर कोणी थुंकू नये यासाठी त्यावर फुले-झाडे आणि पाखरांची चित्रे रेखाटून घेतली. गेल्या सात वर्षात या इमारतीच्या देखभालीकडे मोठे दुर्लक्ष झाल्याचेही यातून समोर आले. मात्र त्याचा विचार न करता त्यांनी आपल्या विभागात कामातून देवत्त्व मिळविणार्या बागलाणच्या (सटाणा) देवमामलेदारांचा आदर्श आपल्यापुढे ठेवला आणि कामानिमित्त कार्यालयात येणार्या प्रत्येकाच्या चेहर्यावर समाधानाचे भाव दिसावे यासाठी महसुली कायद्यांची साक्षरताही घडवून आणली.
दुसर्या मजल्यावर असलेल्या तहसिल कार्यालयाच्या पायर्या चढतांना दोन्ही बाजूने झाडा-फुलांच्या चित्रांची दाटी येथे येणार्यांना वेगळीच अनुभूती देणारी आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून त्यांनीच लिहिलेल्या महसुली कायद्यांच्या गोष्टी यासाठी निवडण्यात आल्या आहेत. ‘जमीन व्यवहाराच्या गोष्टी’ अशा मथळ्याखाली हाव (लालच), पुण्याई, परस्परात फूट (मनभेद) यासह मुखत्यारपत्र, हक्क नोंदणी, एका जमीनीचे दोनदा व्यवहार, देवाची जमीन, जमीनीचे वाटप, वारस नोंद अशा वेगवेगळ्या विषयांच्या छोटेखानी बोधकथांचा वापर करुन तहसिल कार्यालयाच्या आवारातील सर्व भिंतींवर त्याच्या फ्रेम करुन त्या लावण्यात आल्या आहेत. यासोबतच 7/12 उतारा म्हणजे काय? 8 अ (खाते उतारा) कशाला म्हणतात याबाबतही सामान्यांना माहिती देण्यात आली आहे. प्रतीक्षा कक्षात नामदार बाळासाहेब थोरात यांच्या महत्वकांक्षी निर्णयातील एक असलेल्या महाराजस्व अभियानाबाबतच्या माहितीसह महसूलचा ‘हस्तलिखित ते डिजिटल’ असा प्रवासही सचित्र रेखाटण्यात आला आहे. त्यातून दंडाधिकार्यांकडील सुनावणीसाठी दीर्घकाळ येथे थांबणार्यांशी या भिंती बोलतील आणि त्यातून त्यांचे प्रबोधनही होईल.
गेल्या तीन वर्षांचा काळ अखिल विश्वासाठी मोठ्या संघर्षाचा ठरला आहे. मात्र या कालावधीतही संगमनेरच्या तहसिल कार्यालयाने मर्यादांच्या पल्याड जावून आपली भूमिका वठवली आहे. नामदार थोरात यांनी राज्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची संगमनेरात पथदर्शी अंमलबजावणी हे येथील कार्यालयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले आहे. या कालावधीत मिशन म्हणून राबविल्या गेलेल्या 7/12 स्वच्छता मोहिमेत (कालबाह्य नोंदी) तालुक्यातील 3 हजार 812 सातबारा उतार्यांवरील तगाई बोजा अथवा बंडींग बोजा सारख्या 4 हजार 514 नोंदी हटविण्यात आल्या, त्यामुळे गेली अनेक वर्ष उतार्यांवर अशा नोंदी असलेल्या शेतकर्यांना कर्ज मिळण्याची कवाडे उघडली गेली.
महसूल विभागाच्या आजवर सर्वात महत्त्वकांक्षी ठरलेल्या ‘ई-पीक पाहणी’ उपक्रमाची संगमनेरात झालेली अंमलबजावणी राज्यासाठी दिशादर्शक ठरली. महसूल विभागाने यासाठी मोठे परिश्रम घेवून थेट शेतकर्यांच्या बांधावर जात त्यांना मार्गदर्शन केले. या कामात खुद्द महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी केलेले मार्गदर्शन शेतकर्यांमध्ये महसूल विभागाची प्रतिमा उंचावणारे ठरले. महाराजस्व अभियानातून विद्यार्थ्यांनाही दिलासा देण्याचे मोठे काम विभागाने अत्यंत जिद्दीने तडीस नेले. त्यातून एकट्या संगमनेर तालुक्यातील 28 हजार 252 विद्यार्थ्यांना अधिवास, डोंगरी, जात व वय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दाखल्यांचे थेट शाळा व महाविद्यालयात जावून वितरण करण्यात आले.
मागील तीन वर्षांपासून संपूर्ण विश्व कोविडच्या दहशतीखाली वावरत असतांना आरोग्य व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खांद्याला खांदा देत महसूल विभागाने केलेले काम या विभागाला देवमामलेदारांचे देवत्त्व पुन्हा मिळवून देणारेच ठरले. पहिल्या संक्रमणाच्या काळात खासगी डॉक्टरांची मोठी कमतरता निर्माण झाली होती. मात्र प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे आणि तहसिलदार अमोल निकम यांनी त्यावर मात करीत संगमनेरात ‘कोविड बाह्यरुग्ण विभाग’ सुरू करुन सामान्यांना मोठा दिलासा देण्यासोबतच त्यांच्या मनातील भितीही घालविली. या कालावधीत गोरगरीबांच्या अन्नाची परवड होवू नये याकडेही या द्वयींनी लक्ष ठेवतांना त्यांच्या अन्नपाण्याची सोय केली. गरजूंना अत्यावश्यक वस्तुंचे वितरण केले.
बाधितांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी दिवस-रात्र एक केला. या दरम्यान तालुक्यात काम करणार्यांसह महानगरातून पायी चालत संगमनेरात आलेल्या शेकडों मजूरांना त्यांच्या ऐच्छिक स्थळी पोहोचवण्याचे महद् कार्यही या विभागाकडून यशस्वीपणे राबविले गेले. दुसर्या संक्रमणाने अवघ्या जिल्ह्यात त्राही उडालेली असतांना संगमनेरात दुसर्या क्रमांकाचे रुग्ण सापडूनही उपचाराविना अथवा ऑक्सिजनशिवाय कोणताही रुग्ण मागे राहिला नाही. आवश्यक असलेले ऑक्सिजन वेळीच सर्व रुग्णालयांपर्यत पोहोचवण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी आणि कोतवाल या सगळ्याच कड्यांनी अक्षरशः जीव ओतून काम केले. लसीकरणातही आपल्या कर्तृत्वाची छाप सोडताना जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरणात संगमनेरचाच बोलबाला राहीला. या सर्व परिश्रमांचे चित्ररुपी दर्शन आता या कार्यालयाच्या भिंतीही देवू लागल्या आहेत. आज सायंकाळी रुपडे बदललेल्या या कार्यालयात खुद्द महसूल मंत्री येत असून आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात मोठा असल्याची प्रतिक्रीया तहसीलदार अमोल निकम यांनी यानिमित्ताने दिली आहे.