अवघ्या छत्तीस तासात संगमनेरचा पाणी पुरवठा सुरळीत! पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची कामगिरी; पूलाचे कामही लवकरच मार्गी लावणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सततचा वाळू उपसा आणि त्यातच पात्राच्या कडेने सांडपाणी वाहून नेण्यासाठी खोदलेल्या चराने घात केल्याने अवघ्या दशकभरापूर्वी उभा राहिलेला साईनगर-पंम्पीग स्टेशनकडे जाणारा पूल गुरुवारी (ता.13) दुपारी एका बाजूने खचला. त्यामुळे प्रवरा काठावरील वसाहतींकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने या भागातील रहिवाशांना लांबचा प्रवास करावा लागत आहे. या घटनेत पूलावरुन नेण्यात आलेल्या पालिकेच्या विविध जलवाहिन्याही उखडल्याने गुरुवारी सायंकाळपासून शहरात निर्जळी घोषित करण्यात आली होती. मात्र पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने गेले छत्तीस तास अविश्रांत परिश्रम घेत आजपासून शहरातील सर्व जलकुंभांवरुन होणारा पाणी पुरवठा सुरळीत केला असून म्हाळुंगी नदीपात्रातील प्रवाह आटताच खचलेला पूल पुन्हा उभा करण्याची कवायत सुरु केली जाणार आहे.

गेल्या गुरुवारी (ता.13) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगी नदीवरील साईबाबा मंदिराकडे जाणारा पूल अचानक उत्तरेकडील बाजूने खचला. यावेळी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पूलावरुन जाणार्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. पूल खचत असल्याची बाब सर्वप्रथम या कर्मचार्यांच्याच लक्षात आली. त्यामुळे त्यांनी तत्काळ वरीष्ठांना याबाबत माहिती दिल्यानंतर माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह पालिकेच्या विविध विभागातील अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत पंम्पींग स्टेशनवरुन शहरातील विविध जलकुंभांकडे गेलेल्या पालिकेच्या जलवाहिन्याही उखडल्याने एकीकडे प्रवरा काठावरील लोक वसाहतीचा शहराशी असलेला थेट संपर्क खंडीत होण्यासह पाणी पुरवठा करण्यातही अडथळा निर्माण झाला.

मात्र पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तत्काळ जलवाहिन्या दुरुस्तीचे काम होती घेत अवघ्या चोवीस तासांतच अविश्रांत परिश्रम घेत उखडलेल्या सर्व जलवाहिन्या पूर्ववत केल्या. शुक्रवारी दुपारनंतर जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याद्वारे रात्री उशिराने शहरातील जलकुंभ भरले गेल्याने आज (ता.15) सकाळपासून शहरातील सर्व भागातील पाणी पुरवठा सुरुळीत करण्यात आला आहे. त्यामुळे संगमनेरकरांना केवळ एका दिवसाचीच निर्जळी सोसावी लागली. पूलाचा खचलेल्या भागापासूनच जाणार्या या जलवाहिन्यांचे काम करतांना पालिकेच्या कर्मचार्यांनी अगदी जीव मुठीत धरुन कर्तव्य बजावले. त्यांची कामगिरी यशस्वी झाल्यानंतर पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सर्व कर्मचार्यांचे अभिनंदन केले.

एकीकडे जलवाहिन्यांचे काम युद्धपातळीवर झाले असले असले तरीही साईबाबा मंदिराकडे जाणारा मार्ग मात्र अद्यापही बंदच आहे. त्यातच चव्हाणपुर्याकडून वेताळमळ्याकडे जाण्यासाठी पालिकेने नदीपात्रात सिमेंटचे पाईप टाकून केलेला कच्चा पूलही पावसाळ्यात वाहून गेल्याने साईनगर, पंम्पीग स्टेशन, घोडेकर मळा, हिरे मळा, वेताळ मळा, गंगामाई परिसरात राहणार्या नागरिकांसह दिगंबर गणेश सराफ विद्यालय व डॉ. देवेंद्र ओहरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गेल्या दोन दिवसांपासून मालपाणी हेल्थ क्लब – कासारवाडी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. पुढील आणखी काही दिवस त्यांना हा त्रास सोसावा लागणार आहे.

सध्या जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरु असल्याने आढळा व म्हाळुंगी या दोन्ही नद्या वाहत्या आहेत. जोपर्यंत नदीपात्रातील पाणी थांबत नाही तो पर्यंत पूलाचे नेमके किती व कसे नुकसान झाले हे लक्षात येणे अशक्य असल्याने पालिका प्रशासनाने भोजापूर जलाशयाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून नदीपात्रातील पाणी बंद करुन ते कालव्यांमध्ये वळवण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र सध्या म्हाळुंगीच्या लाभक्षेत्रात सोयाबीन सोंगणीला वेग आलेला असल्याने चार्यांमधून पाणी सोडण्यास शेतकर्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे तूर्त नदीतील पाणी बंद करण्यास भोजापूरच्या व्यवस्थापनाने नकार दिला आहे. मात्र रविवारी सायंकाळपर्यंत नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह बंद करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

त्यानुसार रविवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पूलाच्या नुकसानीची माहिती घेवून त्याच्या दुरुस्तीचा आराखडा सादर करणार असून त्यानंतर आवश्यक खर्चाची तरतूद करुन तातडीने पूलाची दुरुस्ती करण्यात येईल असे पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी दैनिक नायकशी बोलताना सांगितले. सध्या पालिकेत प्रशासकीय कारभार असला तरीही सदरील पूलाचे काम करण्यास कोणतीच अडचण येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे नदीपात्रातील पाणी थांबल्यानंतर पूलाच्या डागडूजीलाही सुरुवात होणार असल्याचे संकेतही मिळाले आहेत.

सहा जलकुंभातून पाणीपुरवठा सुरळीत!
संगमनेर शहरात राहणार्या नागरीकांना पालिकेच्या एकूण आठ जलकुंभाद्वारे दररोज 95 लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यात मार्केट यार्ड येथील जलकुंभावरुन 16.5 लाख, नेहरु उद्यान, वडजे मळा व सह्याद्री महाविद्यालयाजवळील जलकुंभावरुन प्रत्येकी 14 लाख, प्रस्तावित पाबळे वस्ती जलकुंभावरुन 12 लाख, परदेशपुरा येथील नवीन जलकुंभावरुन 10 तर जुन्या जलकुंभावरुन 6 लाख तर ज्ञानमाता विद्यालया जवळील जलकुंभाद्वारे नऊ लाख लिटर पाण्याचे दररोज वितरण होते. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने या सर्व जलकुंभांवर जाणार्या वाहिन्यांची कामे पूर्ण केली असून आजपासून शहराच्या सर्व भागात पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु झाला आहे.

