निर्यात बंदी उठेपर्यंत राज्य सरकारने शेतकर्यांना मदत द्यावी ः विखे
निर्यात बंदी उठेपर्यंत राज्य सरकारने शेतकर्यांना मदत द्यावी ः विखे
केवळ केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप
नायक वृत्तसेवा, राहाता
‘कांदा निर्यात बंदीसंबंधी राज्य सरकारने केवळ केंद्र सरकारला दोष देऊन चालणार नाही. निर्यात बंदी उठवेपर्यंत राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांना मदत द्यावी,’ अशी मागणी माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे. ‘कांदा प्रश्नी आता आंदोलन करणारे नेते मागील सहा महिने कोठे होते,’ असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
दूध दरवाढीच्या मागणीसाठी पूर्वी विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आंदोलन करून सरकारला धारेवर धरले होते. आता कांदा प्रश्नी केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षांची आंदोलने सुरू झाली आहेत. यासंबंधी विखे यांची भूमिका काय आहे, याबद्दल उत्सुकता होती. प्रसार माध्यमांशी बोलताना विखे म्हणाले, ‘कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी ही सर्वांचीच मागणी आहे. यासंबंधी केंद सरकार लवकरच निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. मात्र कांद्याच्या प्रश्नावरून केंद्र सरकारला लक्ष करणार्या महाविकास आघाडी सरकारने मागील सहा महिन्यांत शेतकर्यांना कोणती मदत केली. केंद्र सरकारने निर्णय मागे घ्यावा, यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरूच आहे. अहमदनगरचे खासदार डॉ.सुजय विखे यांनीही या विषयावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली आहे. केंद्र सरकार आपला निर्णय मागे घेईलच. तोपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपली जबाबदारी का पार पाडत नाही? केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.’
गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोनामुळे बाजार समित्या बंद राहिल्या, शेतीमालाला भाव नाही, शेतकर्यांनी कवडीमोल भावाने आपला माल विकला. तेव्हा महाविकास आघाडीमधील मंत्री आणि नेते झोपले होते का ऐन पेरणीच्या काळात शेतकर्यांसमोर यूरिया खताची टंचाई होती. सोयाबीन बियाणांमध्ये शेतकर्यांची फसवणूक झाली. तेव्हा आजचे आंदोलन करणारे कुठे होते. केंद्र सरकार कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेईपर्यंत राज्य सरकारने कांदा उत्पादकांना मदत करावी, आशी जोरदार मागणीही विखे यांनी केली आहे.