द्राक्ष उत्पादक फसवणूक प्रकरणी एका आरोपीस अटक अकरा लाखांची फसवणूक; दोन पसार आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील धनगरवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी महिला व तिच्या काकाची 11 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी पकडले असून दोन पसार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीस पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकरी महिला ज्योती रामभाऊ लोखंडे व त्यांचे काका बाबुराव विठ्ठल शेळके यांच्या वाकडी शिवारात द्राक्ष बागा आहेत. त्यांच्या बागेतील द्राक्ष पिकाचा सौदा 20 लाख 20 हजार रुपयांना ठरविला होता. अमोल मनसुब जोंधळे, प्रशांत मनसुब जोंधळे, प्रमोद मनसुब जोंधळे (सर्व रा. कोंची, ता. संगमनेर) यांच्याशी हा सौदा झाला होता. या सौद्यातील ठरलेल्या रकमेपैकी 9 लाख 20 हजार रुपये ज्योती लोखंडे व बाबुराव शेळके यांना धनादेशाद्वारे दिले.

उर्वरीत 11 लाख रुपये नंतर देतो असे सांगून त्यांच्या बागेतील द्राक्षे काढून नेले. सदरच्या रकमेची वेळोवेळी मागणी करूनही दिली नाही. फिर्यादी ज्योती लोखंडे व त्यांचे काका आरोपी जोंधळे यांच्याकडे पैसे मागण्यासाठी कोंची येथे गेले असता आरोपींनी शिवीगाळ करून त्यांना धमकी दिली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अमोल मनसुब जोंधळे, प्रशांत मनसुब जोंधळे, प्रमोद मनसुब जोंधळे या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत यातील अमोल मनसुब जोंधळे हा संगमनेर तालुक्यातील कोंची येथेच त्याच्या घरी असल्याची खबर मिळताच पोलिसांनी त्यास त्याच्या घरुन अटक केली असल्याची माहिती या प्रकरणाचे तपासी अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री. शिंदे यांनी दिली. या प्रकरणातील प्रशांत मनसुब जोंधळे, प्रमोद मनसुब जोंधळे हे दोन आरोपी अद्याप पसार असून पोलीस या दोघांनाही लवकरात लवकर अटक करणार असल्याचेही पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंदे यांनी सांगितले. यातील अटक करण्यात आलेल्या अमोल मनसुख जोंधळे यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
