शनिशिंगणापूरमध्ये कोविड सेंटर सुरू होणार कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने घेतला निर्णय
नायक वृत्तसेवा, नेवासा
शहरासह तालुक्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने शनिशिंगणापूर येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, जिल्हा परिषद सभापती सुनील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
सोनई येथे एकाच दिवशी 65 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.कसबे, विश्वस्त पोपट शेटे, आप्पासाहेब शेटे यांच्यासह देवस्थानचे विभाग प्रमुख उपस्थित होते. बानकर म्हणाले, आमचे मार्गदर्शक मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड सेंटर सुरू करत आहोत. देवस्थानच्या वाहनतळावरील भक्तनिवासात हे सेंटर सुरू होईल. येथे रुग्णांसाठी दोन्ही वेळेच्या भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
देवस्थानच्या रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर भेंडा येथील कोविड सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयात कोविडचे रुग्ण ठेवण्यासाठी काय करता येईल व तेथील उपाय योजनांबाबत चर्चा झाली. मागील वर्षीही तालुक्यातील रुग्णांनी शिंगणापूरच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेतले. त्यावेळी रुग्णांना वाचनालयातील पुस्तके, मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली होती.