शहरातील कसायांवरील पोलिसांचा धाक संपला? वारंवारच्या कारवायांनंतरही संगमनेरातील कत्तलखाने सुरुच

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरातील बेकायदा गोवंश कत्तलखान्याच्या हालचाली अद्यापही सुरुच असल्याचे शहर पोलिसांच्या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिसांच्या गस्ती पथकाने एका संशयित टेम्पोवर कारवाई करतांना तब्बल तीन लाख रुपये मूल्याच्या बारा गायींची कसायांच्या ताब्यातून सुटका केली असून वाहतूक करणार्‍या टेम्पो चालकास गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. संगमनेरातील कत्तलखान्यांवर वारंवार कारवाया होवूनही ते बंद होण्याचे नाव घेत नसल्याने कसायांना कायद्याचा धाक राहीला नसल्याचे वास्तवही या कारवाईतून उघड झाले आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार बुधवारी (ता.4) रात्री संगमनेर-लोणी रस्त्यावरील समनापूर शिवारात एक आयशर टेम्पो (क्र.एम.एच.14/बी.जे.2005) भरधाव वेगाने जात असल्याचे पोलिसांच्या गस्ती पथकाच्या लक्षात आले. सदर पथकाने त्या टेम्पोचा पाठलाग करीत शिवारातील हॉटेल तिरंगानजीक त्याला अडविले. यावेळी पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यात अनेक गायी अत्यंत निर्दयीपणाने आणि दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे पथकाला दिसले. त्याबाबत चालकाकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवी करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी त्याच्यासह टेम्पो ताब्यात घेतला.

शहर पोलीस ठाण्यात आल्यावर चालकाकडे अधिक चौकशी केल्यानंतर सदरची गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे स्पष्ट झाली. या प्रकरणी पो.कॉ.सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी टेम्पोचा चालक मोहंमद एजाज इसाक सौदागर याच्या विरोधात शहर पोलिसांनी महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्याचे कलम 5 (अ), 1, 9 तसेच प्राण्यांना निर्दयीपणाने वागणूक देण्यास प्रतिबंध करणार्‍या कायद्याचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करुन त्याला गजाआड केले. या कारवाईत पोलिसांनी प्रत्येकी 25 हजार रुपये मूल्य असलेल्या तीन लाख रुपये किंमतीच्या बारा गायींना जीवदान दिले, तर सुमारे साडेतीन लाख रुपये मूल्याचा आयशर कंपनीचा टेम्पोही जप्त केला.

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून आजवर शहर पोलिसांनी येथील गोवंश कत्तलखान्यांवर दहा-वीस वेळा नव्हे तर शेकडो वेळा छापे घालून कारवाया केल्या आहेत. पोलिसांच्या आजवरच्या कारवायांमधून शेकडो टन गोवंशाच्या मांसासह शेकडो जिवंत जनावरे मुक्त करण्यात आली आहे. वारंवारच्या या कारवायांमधून शेकडों कसायांवरही गुन्हे दाखल झाले व पुन्हा पुन्हा तेच कसाई व वाहतूक करणारी वाहनेही समोर आली. मात्र संगमनेरातील कत्तलखाने पूर्णतः बंद करण्यात गेल्या आठ वर्षात एकही पोलीस निरीक्षक यशस्वी ठरलेले नाहीत. या कारवाईने संगमनेरातील कसायांमध्ये काहीकाळ खळबळ माजली असली, तरीही त्यातून येथील कत्तलखाने बंद होण्याची कोणतीही अपेक्षा नाही.


एकाच गुन्ह्यात वारंवार सापडणारे तेच ते आरोपी, वाहतुकीसाठी वापरली जाणारी तिच ती वाहने सापडूनही या कारवायांनी ना कसायांवर धाक निर्माण केला, ना वाहतुकदारांवर. याचा सरळ अर्थ एकतर पोलिसांची कारवाई थातूरमातूर आहे, किंवा कसायांना पोलिसांचा कोणताही धाक शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी एकतर कारवाईची पद्धत बदलण्याची गरज आहे, किंवा गोवंश हत्याबंदी कायदा चुकीचा असल्याचे वरीष्ठांमार्फत शासनाला पटवून देण्याची गरज आहे. मात्र या दोन्ही गोष्टी घडणार नाहीत हे देखील यामागील वास्तव आहे.

Visits: 114 Today: 1 Total: 1413577

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *