घरफोडीचा तपास स्थानिक गुन्हे शाखा अथवा गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करा!
घरफोडीचा तपास स्थानिक गुन्हे शाखा अथवा गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करा!
देवगावचे पत्रकार फिरोज शेख यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील देवगाव येथील पत्रकार फिरोज नसीर शेख यांनी त्यांच्या घरी झालेल्या चोरीचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) अथवा गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) 15 दिवसांत तपास करावा, अशी मागणी नुकतीच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांना दिलेल्या निवेदनात पत्रकार शेख यांनी म्हंटले की, नेवासा तालुक्यातील देवगाव येथील माझ्या घरात गुरुवार दि.3 सप्टेंबर, 2020 रोजी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. घराचे तीन दरवाजे तोडून सहा खोल्यांची उचकापाचक केली होती. यामध्ये माझ्या पत्नीचे दीड तोळे सोन्याचे गंठण, पायातील चांदीचे चार जोडवे आणि रोख रक्कम असा 1 लाख 20 हजार मुद्देमाल चोरट्यांनी लुटला आहे.
सध्या कोरोना संकट चालू असल्यामुळे चोर्यांचे प्रमाण वाढत आहे. माझ्या घरात प्रवेश करुन धाडशी चोरी झाली याचा एलसीबी अथवा सीआयडीमार्फत तपास करावा. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व तपास करत आहे. मग याचप्रमाणे माझ्यासारख्या गरीब, सर्व सामान्य नागरिकाच्या घरावर झालेल्या चोरीचा तपास एलसीबी किंवा सीआयडीमार्फत प्रशासनाने त्वरीत लावावा. चोरी झाल्यापासून माझी पत्नी आणि दोन मुलांसह घरातील सर्वच सदस्यांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. मलाही रात्र-रात्र भीती वाटत आहे. या चोरीमुळे माझ्या जीविताला धोका आहे. माझे दागिन्यांसह रोख रक्कम चोरी गेल्याने मी पूर्णत: खचलो आहे. टाळेबंदीपासून माझी अर्थिक परिस्थिती अधिक ढासळली आहे. मी मोलमजुरी करुन माझ्या कुटुंबांची उपजीविका करत असून आता माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
दरम्यान, गावातील काही गावगुंड सराईत गुन्हेगार माझ्या घरी येवून मला, माझ्या भावांना आणि आई-वडीलांना दमदाटी व शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे. याबाबत माझा भाऊ समीर नसीर शेख याच्या नावाने मी दि.10 सप्टेंबर, 2020 रोजी रीतसर फिर्यादही दिली आहे. माझ्या घरी चोरी होऊन तेरा दिवस झाले तरीही नेवासा पोलीस अजून तपासच करत असून आत्तापर्यंत आम्ही कोणत्याही संशयीत आरोपीचे नाव पोलिसांना दिलेले नाही. सर्व तपासात संशयीत कोण आहे हे नेवासा पोलीस तपासत आहे. तरीही गावातील गावगुंड, सराईत गुन्हेगार माझ्या परिवाराला धमक्या देत आहे. या गावगुंडांपासून आमच्या परिवाराला धोका आहे तरी या चोरी प्रकरणाचा तातडीने तपास लावावा व गावगुंडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.