पशूहत्या नाकारणारी चंदनापुरीची ‘मूळगंगा माता’! देवीच्या आराधनेसाठी अख्खी पंचक्रोशी करते दर मंगळवारी उपवास
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याला जसा ऐतिहासिक वारसा आहे, तसा धार्मिक वारसाही खूप मोठा आहे. तालुक्याच्या सभोवतालच्या घाटांवर असणारी शिवमंदिरे आणि खालच्या भागात दरीतील शक्तिस्थळे यावरुन हा पुरातन वारसा लक्षात येतो. त्यातीलच एक म्हणजे चंदनापुरीची मूळगंगा माता. अतिशय प्राचीन महत्त्व असणारी आणि भाविकांची इच्छापूर्ती करणारी देवी अशी या मंदिराची दूरदूरपर्यंत ख्याती आहे. नायट्यासारखा त्वचारोग झालेल्या मंडळींना देवी जागृत असल्याची प्रचिती मिळते असे गावकरी छातीठोकपणे सांगतात. या देवीला पशूहत्या चालत नाही, त्यामुळे दर मंगळवारी संपूर्ण पंचक्रोशी उपवास धरते. कोणाच्याही घरात मांसाहारी अन्न शिजवले जात नाही, ना बाहेर जावून कोणी भक्षण करते. विशेष म्हणजे या गावातून लग्न होवून सासरी गेलेल्या मुलीही हाच नियम आयुष्यभर पाळतात.
बाळेश्वर..! अर्थात शंभू महादेवाच्या बाल्यावस्थेतील स्थान. बाळेश्वरांच्या डोंगररांगा यावरुनच ओळखल्या जावू लागल्या. त्यावरुनच संगमनेर तालुक्याचे प्रागैतिहासातील स्थान लक्षात येते. तालुक्याच्या अनेक भागात स्वयंभूू जागृत ठिकाणं आहेत, जेथे अनेकांची श्रद्धा जडलेली आहे. असं म्हणतात की महाभारत काळात पांडव अज्ञातवासात असताना दंडकारण्याच्या या भागातून मार्गक्रमण करीत असताना त्यांनी या शक्तिस्थानाची आराधना केली व तेथे दुमजली लाकडी अत्यंत रेखीव मंदिर निर्माण केले. पश्चिम दिशेला ओढा वाहत असलेल्या या स्थानावर दगडी बांधकामातील प्राचिन शिवमंदिर आहे. त्या बाजूलाच पार्वती म्हणजेच मूळगंगा मातेचे स्थान आहे. पांडवांनंतर वेळोवेळी या मंदिराचा जिर्णोद्धार होत गेला, मात्र लाकडांचा वापर करण्याची पांडवांची मूळ संकल्पना कायम राहिली. अलिकडच्या काळात ग्रामस्थांनी लोकसहभाग आणि शासनाच्या ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र निधीतून मंदिर व परिसराचा देखणा विकास केला आहे. करवीर पीठाधीश शंकराचार्य विद्यानंद भारती यांच्या शुभहस्ते नूतन मंदिरात देवीच्या प्रसन्न मुद्रेतील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मुख्य मूर्तीच्या पुढ्यात महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि रेणुकामातेचे मुखवटेही पूजले जातात हे येथील सर्वात मोठे धार्मिक वैशिष्ट्य आहे.
या शक्तिस्थळात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी आणि माहूरची रेणुका यांचे मूळ आहे. त्यावरुनच या स्थानाचे नाव मूळगंगा असे पडले आहे. त्यामुळे या स्थानावरील मुख्य जागी मूळगंगा स्वरुप माता पार्वतीची देखणी मूर्ती दिसते आणि त्याच्यासमोर तिचे अंश असणार्या महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि माहूर निवासिनी रेणुकामातेचे मुखवटेही दर्शन देतात. या स्थानाचे सर्वात मोठे महत्त्व म्हणजे एकाच दर्शनात या चार तीर्थस्थानांचे दर्शन घेतल्याचे मानसिक समाधान भाविकांना लाभते. वर्षभरातील विविध सण-उत्सवांसह नवरात्रात येथे मोठा डामडौल असतो. देवीची यात्रा भरवण्याचीही गावची जुनी पंरपरा आहे. मात्र येथे कोणत्याही प्रकारची पशूहत्या मनाई आहे.
मराठा समाजाचे प्रभुत्त्व असलेल्या चंदनापुरी गावासह पंचक्रोशीत दर मंगळवारी उपवास केला जातो. या दिवशी कोणाच्या घरात मांसाहार केला जात नाही. घरातील व्यक्ती जगाच्या पाठीवर कोठेही असली तरी ती मंगळवारी मांसाहार करीत नाही. चंदनापुरीतून सासरी गेलेल्या मुलीही हा नियम आजन्म पाळतात. या शक्तिस्थानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे नायटा हा त्वचारोग पूर्णपणे बरा होतो असा येथील ग्रामस्थ छातीठोकपणे दावा करतात. काळेबाबा नावाच्या गावातील एका इसमाने आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारुन मातेची सेवा केली. त्यांच्या निधनानंतर गावकर्यांनी त्यांचा मोठा सन्मान करुन मंदिराच्या मागील बाजूस त्यांची समाधी उभारली. त्यांचे सर्व कार्यविधी पार पाडले. अशा या जागृतस्थानाची महती महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात सारख्या राज्यांमध्येही पसरली असून दूरदूरवरुन भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करीत असतात.
मोठे प्राचिन महत्त्व असलेली चंदनापुरीची मूळगंगा माता केवळ संगमनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण राज्यासह कर्नाटक, गुजराथ येथील भाविकांचेही श्रद्धास्थान आहे. येथे येवून देवीची करुणा भाकल्यास नायटारोगी असलेल्यांचा रोग पूर्णतः बरा होतो असा दावा येथील ग्रामस्थ करतात. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी आणि माहूरची रेणुका अशा तीन शक्तिस्थळांचं मूळ असलेल्या या स्थानाचे अगदी प्रागैतिहासापासून महत्त्व असल्याचे सांगितले जाते.