विस्थापित टपरीधारकांचे लवकरात लवकर पुनर्वसन करा!

विस्थापित टपरीधारकांचे लवकरात लवकर पुनर्वसन करा!
श्रमिकराज संघटनेचे कोपरगाव पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
दहा वर्षांपूर्वी नगरपालिकेने शहरातील रस्ते, चौक व इतर ठिकाणचे अतिक्रमण काढले होते. त्यानंतर शहरातील विस्थापित टपरीधारकांनी आपले पुनर्वसन व्हावे यासाठी वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे. परंतु या गोष्टीला दहा वर्षे उलटून गेले तरी अद्याप पालिकेने टपरीधारकांचे पुनर्वसन करण्याबाबत कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. कोरोना महामारीच्या आगीत होरपळल्यानंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून श्रमिकराज संघटनेने टपरीधारकांचे पुनर्वसन व्हावे या मागणीचे नुकतेच पालिका मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना निवेदन दिले आहे.


10 जानेवारी, 2011 मध्ये कोपरगाव नगरपालिकेने शहरातील अतिक्रमण काढले होते. त्यामध्ये टपरीधारकांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. त्यावेळी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी फक्त आश्वासने दिल्याने विस्थापितांचे व्यवसाय बंद झाले व शहरातील टपरीधारक देशोधडीला लागला. काही जणांचे तर अक्षरश: प्रपंच उध्वस्त झाले आहे. बरेच व्यावसायिक कोपरगाव सोडून पोट भरण्यासाठी बाहेरगावी गेले आहेत; व्यवसायाच्या भरवश्यावर बँका व पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज स्वत3चे राहते घर विकून भरण्याची नामुष्की टपरीधारकांवर आली आहे. काही विस्थापित आजही गावोगावी भटकंती करुन आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. ते आज बेरोजगार राहिल्याने मुलांचे शिक्षणही अपूर्ण राहिले आहहे. तरी या सर्व बाबींचा विचार करून नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत हा विषय मांडून लवकरात लवकर टपरीधारकांचे पुनर्वसन करावे असे या निवेदनात नमूद केले आहे.


या निवेदनावर तालुकाध्यक्ष अजय विघे, संघटक राहुल धिवर, सचिव गणपत पवार यांच्या सह्या आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, तालुकाध्यक्ष विघे, गणेश शिंदे, संघटक धिवर, सचिव पवार, बालाजी गोर्डे हे प्राथमिक स्वरूपात उपस्थित होते.

Visits: 17 Today: 1 Total: 115710

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *