नेवासा तालुक्यात झाडे जाळून कोळशाचा व्यापार! वन विभागाचे दुर्लक्ष; वेळीच पायबंद घालण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, नेवासा
झाडे जाळून कोळशाची विक्री व अवैध वृक्षतोड करणार्‍या टोळ्यांनी सध्या राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील मोठमोठ्या झाडांना लक्ष्य केले आहे. आदल्या रात्री झाडांच्या बुंध्यांना आग लावून, दुसर्‍या रात्री ती पाडून लाकडासह कोळसा विकण्याचा उद्योग सध्या नेवासा तालुक्यात जोरात सुरू आहे. नेवासा-शेवगाव रस्त्यावर मोठ्या झाडांना लावलेल्या आगीमुळे हा प्रकार उजेडात आला आहे.

राज्य महामार्गावरील वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम व वन विभागावर, तर राष्ट्रीय महामार्गाची जबाबदारी वरील दोन्ही विभागांसह नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाची आहे. मात्र, हे विभाग एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत. यांच्याच मूकसंमतीने हा सर्व प्रकार सुरू असल्याने, जबाबदार धरायचे कुणाला आणि तक्रार करायची कुणाकडे, हा प्रश्न आहे.

वृक्षांच्या कत्तलीचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. केंद्र व राज्य सरकारांकडून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतो. श्रीरामपूर-नेवासा-शेवगाव या महामार्गावर गेल्या वर्षभरात 63 झाडांचे बुंधे जाळण्याचे, तसेच वृक्षांच्या मुळाशी व सालीवर कुर्‍हाडीने घाव घालून ती वळविण्याचे ‘प्रयोग’ 107 झाडांवर करण्यात आले. बिगरभांडवली, कमी कष्टात जास्त पैसा मिळत असल्याने या धंद्यात अनेक टोळ्या सक्रीय आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकार घातक असून, यासाठी वृक्ष पेटविणे व वृक्षतोडीला शासनाने वेळीच पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे.


असा होतो झाडांवर ‘प्रयोग’..
झाडांच्या बुंध्यांजवळ दोन-तीन फूट खड्डे घेऊन, आग लावून त्यावर मातीचा पातळ थर द्यायचा. झाडाचा बुंधा आपोआप पेट घेऊन झाड चौदा-पंधरा तासांनी कोसळते. रातोरात त्याची कत्तल करून ते पसार केले जाते. झाडाने जास्त पेट घेतल्यास ते जवळच एक खड्डा घेऊन पुरले जाते. त्यापासून कोळसा निर्माण केला जातो. बिगारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून, त्या जागा अद्यापही रिक्तच आहेत. त्यामुळे रस्त्यांसह हद्दीतील वृक्षांची देखभाल करण्यासाठी मजूर नाही.
– रमेश खामकर (शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम, नेवासा)

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील वृक्षतोड थांबविण्याची व झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे.
– मुसा सय्यद (वनरक्षक, नेवासा)

Visits: 85 Today: 1 Total: 1111935

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *