प्रशासनाच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे
प्रशासनाच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे
कोठे बुद्रूक : अवैध दारुबंदीसाठी ग्रामस्थाचे उपोषण
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कोठे बुद्रूक गावातील अवैधरित्या सुरू असलेली दारूविक्री व जुगार बंद व्हावे म्हणून पोपट खंडू भालके यांनी बुधवारपासून (ता.16) ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. अखेर गुरुवारी (ता.17) सकाळी तहसीलदार अमोल निकम, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आर. डी. वाजे, पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे व जिल्हा परिषदचे काँग्रेस गटनेते अजय फटांगरे यांनी उपोषणस्थळी भेट देत आश्वासन दिल्यानंतर भालके यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कोठे बुद्रूक गावात काही लोक अवैधरित्या देशी दारूची विक्री व जुगार खेळत आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून या त्रासाला महिलाही वैतागल्या होत्या. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करुनही संबंधित विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले होते. त्यानंतर त्यांनी बुधवारपासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसून पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत प्रशासनाने गुरुवारी उपोषणस्थळी भेट देऊन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणार्थी पोपट भालके यांनी आपले उपोषण घेतले. यावेळी सरपंच माया भालके, उपसरपंच संपत जाधव, शांताराम वाकळे, नाना भालके, सुहास वाळुंज, रमेश आहेर, रंगनाथ भालके यांसह महिलाही उपस्थित होत्या.