‘देवकौठे’ गावातील इमारत ठरतेय गावकर्यांसह पर्यटकांचा सेल्फी पॉइंट महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या पुढाकारातून बदलले गावाचे नाव

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पूर्वीच्या काळी काही वैशिष्ट्य अगर कारणांतून गावांची नावे पडली. त्यांच्या आख्यायिकाही सांगितल्या जातात. तेव्हाच्या काळात लोकांना ही नावे चालत होती. अलीकडे मात्र विचित्र अगर बदनामीकारक नावे ग्रामस्थांना नको वाटतात. संगमनेर तालुक्यात असे चोरकौठे नावाचे गाव होते. ग्रामस्थांना ते खटत असल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून ते बदलून देवकौठे करण्यात आले. मधल्या काळात गावाची भरभराट झाली. या भरभराटीची साक्ष ठरणारी एक इमारत गावात आहे, तीच आता गावकरी आणि पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट ठरत आहे.

देवकौठे गाव संगमनेर तालुक्याच्या आणि अहमदनगर जिल्ह्याच्याही उत्तर टोकावर आहे. संगमनेर, सिन्नर,कोपरगाव या तीन तालुक्याच्या सीमांवर हे गाव आहे. गावातील जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर या परिसरातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली ऐतिहासिक व पौराणिक बारव ही या गावची ओळख राहिली आहे. या बारावातील चोर खोली वरूनच या गावाला चोरकौठे असे नाव पडले होते, अशी आख्यायिका आहे. ग्रामस्थांना ते खटकत होते. त्यामुळे 2012 मध्ये मंत्री थोरात यांच्या पुढाकारातून या गावाचे नाव चोरकौठे बदलून देवकौठे केले. गावातील मंदिर व बारव पाहण्यासाठी अनेक पर्यटक व भाविक याठिकाणी येत असतात.

मधल्या काळात गावात अनेक विकास कामे झाली. येथील दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन व्यवसाय संपूर्ण राज्याभर पसरला आहे. दुष्काळी भागात असूनही दररोज दहा हजार लिटरचे दूध उत्पादन केले जाते. तसेच सात लाख अंडी उत्पादन करण्याचा विक्रमही गावाने केला आहे. आता आर्थिक स्थैर्य निर्माण झालेल्या या गावात नव्याने जगदंबा दूध संस्थेने आकर्षक इमारत बांधली आहे. या इमारतीच्या दर्शनी भागावर मंत्री बाळासाहेब थोरात यांचे छायाचित्र लावले आहे. गावच्या दर्शनी भागात असलेल्या या इमारतीच्या परिसरात संगमनेर, सिन्नर, कोपरगाव या तालुक्यांमधील अनेक नागरिक आल्यानंतर या इमारतीसमोर सेल्फी काढण्याचा त्यांना मोह आवरत नाही, अशी माहिती या गावातील रहिवाशी नामदेव कहांडळ यांनी दिली.
