साईसंस्थानने जिनोम सिक्वेन्सिंग लॅब उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा ः गमे शिर्डीत ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची आढावा बैठक

नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर साईसंस्थान व जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे. साईसंस्थानने या व्हेरिएंटच्या बाधितांना शोधण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग लॅब उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. रोज पाच हजार आरटीपीआर चाचण्या करण्याचे नियोजन करावे. ऑक्सिजन बेडच्या संख्येत वाढ करावी. लिक्विड मेडिकल ऑक्सिजनसाठी प्लँट कार्यान्वित करावा. वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय सामग्री, ड्युरा सिलिंडर तयार ठेवावेत, अशा सूचना विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रशासनास केल्या.

संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांकरिता नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली श्री साईबाबा संस्थानच्या सभागृहात बुधवारी (ता.22) आढावा बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, कोपरगाव तहसीलदार विजय बोरूडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, श्री साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सुनीता कडू आदी उपस्थित होते.

या बैठकीत सूचना देताना विभागीय आयुक्त गमे म्हणाले, करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर संस्थान व जिल्हा प्रशासनाने समन्वयाने कामकाज केले पाहिजे. संभाव्य लाटेसाठी सज्ज राहिले पाहिजे. यासाठी संस्थानने ‘जिनोम सिक्वेसिंग लॅब’ उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून याचा लाभ विविध आजारांवरील व्हेरिएंट तत्काळ शोधण्यास मदत होईल. तसेच संस्थानने त्यांच्या रुग्णालयातील सध्याच्या ऑक्सिजन बेड्सच्या संख्येत वाढ केली पाहिजे. यासाठी दानशूर संस्थांना मदतीचे आवाहन करावे, असे सांगून प्रत्येक दिवशी पाच हजार लोकांची आरटीपीसीआर चाचणी करता येतील असे नियोजन करण्यात यावे. लिक्वीड मेडिकल ऑक्सिजनसाठी प्लाँट कार्यान्वित करण्यात यावा. वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय सामुग्री, ड्युरा सिलेंडर आदी बाबींचे नियोजन करावे, अशा सूचना गमे यांनी दिल्या.
