विद्यार्थ्यांची ‘कोविड चाचणी’ बंधनकारक नाही! शासनाकडून कोणत्याही सूचना नसल्याने शाळांनी परस्पर निर्णय घेवू नये : तहसीलदार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाचा वेग आटोक्यात आल्याने राज्य सरकारने तब्बल 21 महिन्यानंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संगमनेरातील बहुतेक शाळा येत्या 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार असल्याचे मोबाईल संदेश पालकांना प्राप्त होत आहेत. मात्र त्याचवेळी काही शाळांनी शाळेत येणार्या प्रत्येक विद्यार्थ्याची ‘रॅपिड अँटीजेन चाचणी’ करुन त्याचे प्रमाणपत्र सोबत आणण्याची सक्ति केल्याने पालकांचा गोंधळ उडाला आहे. त्यातच सध्या कोविड चाचण्या करण्यावरही मर्यादा आल्याने चाचणी करायचीच ठरली तर ती कोठे करावी असा प्रश्नही पालकांना पडला आहे. याबाबत संगमनेरचे तहसीलदार तथा इन्सीडेंट कमांडर अमोल निकम यांच्याशी संपर्क साधला असता शासनाकडून असे कोणतेही आदेश नसल्याने कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांच्या कोविड चाचणीबाबत सक्ती करता येणार नसल्याचे सांगितले आहे, याशिवाय शाळांनी परस्पर असे निर्णय घेवू नयेत असेही त्यांनी बजावले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून देशभरासह राज्यात कोविड संक्रमणाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. संगमनेर तालुक्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण आढळले, मात्र प्रशासनाने त्यापूर्वीच 1 मार्चपासून जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. चालू वर्षातील जानेवारी-फेब्रुवारीत राज्यातील संक्रमणाचा वेग मंदावल्याने सार्वजनिक व राजकीय कार्यक्रमांवरील निर्बंध शिथील झाल्याने नागरिकांकडून कोविडच्या प्रति मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले, प्रशासनही सलग वर्षभर कोविड उपाययोजनांमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्याकडूनही नियमांचे सर्रास उल्लंघन होत असतांना त्याकडे डोळेझाक करण्यात आली. या काळात ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा धुराळा उडाल्याने गावोगावी कोविड नियमांची एैशीतैशी करीत प्रचंड गर्दीत सभा झाल्या, प्रचाराचे कार्यक्रम, मतदान आणि मतमोजणीही पार पडली.
या सगळ्यांचा परिणाम कोविडचे संक्रमण सुरु झाल्याच्या बरोबर वर्षभराने एप्रिलमध्ये राज्यात कोविड संक्रमणाची दुसरी लाट आली आणि एप्रिल-मे या दोन महिन्यात या लाटेने राज्यात थैमान घालीत एकट्या संगमनेर तालुक्यातून 20 हजारांहून अधिक रुग्ण समोर येण्यासोबतच हजारावर रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यावेळी शाळा सुरु होण्याबाबत निर्माण झालेले वातावरण पुन्हा गढूळ होवून कोविडबाबत जनमानसात पुन्हा मोठी दहशत निर्माण झाली. त्यातच दुसर्या लाटेचा धुमाकूळ पाहून देशभरातील असंख्य वैद्यकी तज्ज्ञांसह राज्य सरकारातील काही मंत्र्यांनी तिसर्या लाटेची शक्यता जिवंत ठेवल्याने अगदी आत्तापर्यंत संक्रमण पुन्हा भरात येण्याची भिती टिकून होती. गेल्या जवळपास 21 महिन्यांच्या या काळात उद्योग, व्यवसाय, बाजार, चित्रपट गृहे, नाट्यगृहे, हॉटेल्स व रेस्टॉरंट, अम्युझमेंट पार्कस व थीम पार्कस सारख्या आस्थापनांची उघडझाक सुरु राहीली, मात्र मागील वर्षी 1 मार्चरोजी बंद झालेल्या शाळांबाबत मात्र निर्णय होत नसल्याने तब्बल पावणे दोन वर्ष विद्यार्थी घरातूनच ‘ऑनलाईन’ शिक्षणासोबतच ‘ऑनलाईन’ परीक्षा देत होते.
आता राज्यातील देवस्थाने खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने टास्क फोर्सच्या सल्ल्याने येत्या सोमवारपासून (ता.22 नोव्हेंबर) शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळा व्यवस्थापनांनीही आपापल्या शाळांच्या वर्गखोल्यांची साफसफाई करुन त्या सज्ज ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यासोबतच संगमनेरातील काही शाळांनी 22 नोव्हेंबरपासून शाळा सुरु होणार असल्याचे मोबाईल संदेशही पालकांना पाठवण्यास सुरुवात केली असून त्यातील काही शाळांनी शाळेत दाखल होणार्या विद्यार्थ्यांच्या संमतीपत्रासह प्रत्येक विद्यार्थ्याची रॅपीड अँटीजेन चाचणी करण्याची सक्ति केली आहे. त्यामुळे पालकांचा मोठा गोंधळ उडाला असून शाळांनी ‘कोविड चाचणीचे प्रमाणपत्र’ आवश्यक असल्याचे म्हंटल्याने पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
गेल्या जवळपास महिन्याहून अधिक काळापासून प्रशासनाने संगमनेरातील खासगी कोविड चाचण्यांवर निर्बंध घातले आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरासह तालुक्यातील आरोग्य केंद्रामध्ये होणार्या कोविड चाचण्याही आता जवळपास बंद झाल्याने शाळांच्या मागणीनुसार आपल्या पाल्याची कोविड चाचणी नेमकी कोठे करावी? असा प्रश्न पालकांना पडला आहे. वास्तविक ज्या शाळांना विद्यार्थ्यांच्या कोविड चाचणीचे प्रमाणपत्र आवश्यक वाटते त्या शाळा व्यवस्थापनांनी आपल्याच शाळेत विद्यार्थ्यांच्या कोविड चाचणीची सोय करण्याची गरज आहे. मात्र उद्या काही कमीजास्त झाले तर आपल्यावर बालंट नको या विचाराने शहरातील काही शाळा आपली जबाबदारी पालकांच्या खांद्यावर लोटीत असल्याने चित्रही गेल्या काही दिवसांपासून दिसू लागले आहे.
याबाबत संगमनेरचे तहसीलदार तथा इन्सीडेंट कमांडर अमोल निकम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाकडून विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्याबाबत कोणतेही निर्देश नाहीत. त्यामुळे कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांच्या कोविड चाचणीची सक्ति करता येणार नाही. कोणतीही शाळा असे परस्पर निर्णय घेवू शकत नसल्याने शाळांनी विनाकारण पालक आणि विद्यार्थ्यांची धावपळ करु नये असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. त्यामुळे येत्या 22 नोव्हेंबर रोजी शाळा सुरु झाल्यानंतर शाळेत जाण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करावी अथवा नाही याचा सर्वस्वी निर्णय पालकांनीच घ्यायचा असून शाळेकडून कोणतीही सक्ती करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यासह जिल्ह्यातील कोविडचे संक्रमण जवळपास आटोक्यात आले आहे. त्यामुळे टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा येत्या सोमवारपासून (ता.22) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र संगमनेरातील काही शाळांकडून विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्याची सक्ति केली जात असल्याचे समोर आले आहे. शाळा सुरु करतांना शाळेत दाखल होणार्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्याबाबत शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत, त्यामुळे शाळा व्यवस्थापनांना अशी कोणतीही सक्ती करता येणार नाही. शाळांनीही अशा प्रकारे परस्पर निर्णय घेवू नयेत.
– अमोल निकम
तहसीलदार तथा इन्सीडेंट कमांडर, संगमनेर