अहमदनगर जिल्ह्यात पंधराशे एसटी कर्मचारी संपात सहभागी बारा डेपोंमधील कामकाज ठप्प; मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार

नायक वृत्तसेवा, राहाता
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. अहमदनगर जिल्ह्यात 1500 एसटी कर्मचारी संपात सहभागी झाले असून जिल्ह्यातील 12 डेपोमधील कामकाज ठप्प झाले आहे.

कोपरगाव आगारातील कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाल्याने आगारांतर्गत येणार्‍या शिर्डी बसस्थानकावर याचा मोठा परिणाम झाला आहे. दिवाळी सुट्ट्यांमुळे शिर्डीत साई दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. एसटी बसचे नियोजन कोलमडल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरूच राहील अशी प्रतिक्रिया कोपरगाव आगारातील कर्मचार्‍यांनी दिली आहे.

1995 सालापासून एसटी कामगारांच्या अधोगतीला सुरूवात झाली आहे. सोन्याचं अंड देणारं महामंडळ म्हणून नेत्यांनी त्यांच्या कामगार संघटना तयार केल्या आणि कॉन्ट्रॅक्टमधे आजवर मलीदा खाल्ला. एसटीचा कामगार मात्र आजही उपेक्षितच राहिला असल्याचे एसटी कर्मचारी म्हणताहेत. जोवर आमच्या मागण्या मान्य होत नाही तोवर हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संगमनेर डेपोमधील एसटी कर्मचार्‍यांनी केला आहे.

राज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांशी संवाद साधण्याची गरज असून आघाडी सरकार केवळ फेसबुकवर संवाद साधत आहे. सामान्य नागरिकांचे आज मोठ्या प्रमाणात हाल होत असून सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. अगोदरही शिवसेनेकडेच परिवहन खाते होते आजही आहे. सरकारमध्ये इच्छाशक्ती नसल्याचा आरोप माजी परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. आज महाराष्ट्रातील सगळे घटक अडचणीत आहेत. अशावेळी नवाब मलिकांना सुपारी देऊन जनतेचे लक्ष विचलित केले जात असल्याचीही टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

Visits: 98 Today: 2 Total: 1101319

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *