तब्बल 28 वर्षांनंतर बालमित्रांनी दिला आठवणींना उजाळा लोकमान्य विद्यालयाच्या 1993 सालातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

नायक वृत्तसेवा, अकोले
तब्बल 28 वर्षांनंतर बालमित्र एकत्र येवून हास्य, विनोद, जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या कुटुंबाची, जीवन परिचयाची माहिती जाणून घेत सर्वजण आनंदाने गहिवरले. निमित्त होते लोकमान्य विद्यालय धांदरफळ बुद्रुकच्या (ता.संगमनेर) 1993 सालातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे.

रयत शिक्षण संस्थेच्या लोकमान्य विद्यालयातील 1993 सालातील दहावीच्या तुकडीचा स्नेहमेळावा (गेट टू गेदर) नुकताच संपन्न झाला. अतिशय निसर्गरम्य वातावरणात सुमारे 27 जण उपस्थित होते. या तुकडीतील विद्यार्थी विविध क्षेत्रात काम करत आहे. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतानाही सोशल मीडियावर तयार केलेल्या व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून नियोजन करुन दीपावली-भाऊबीज सुट्टीला सर्वजण एकत्र आले. तुकडीतील छायाचित्रकार म्हणून काम करत असलेले विलास शिंदे यांनी इतर काही वर्गमित्रांच्या सहकार्याने सर्व मित्र एकत्र करण्याचा संकल्प केला होता. याची तयारी एक ते दीड वर्षापूर्वीच सुरू केली होती. त्यासाठी व्हाट्सअॅपवर ‘1993चा’ सोशल मीडिया ग्रुप तयार केला. यावर जवळपास सर्व मित्रांचे संपर्क क्रमांक संकलित केले. या माध्यमातून संवाद होऊ लागला.

गेल्या 28 वर्षांपासून एकमेकांना भेटू न शकलेल्या या मित्रांनी एकत्र येण्यासाठी आपल्या 1993 तुकडीचा स्नेहमेळावा (गेट टू गेदर) व्हावा ही संकल्पना धांदरफळ येथील शेतकरी सतीष शेटे, दौलत इस्टेटचे संचालक व उद्योजक राजेंद्र देशमुख, शिक्षक शिवाजी आवारी, छायाचित्रकार विलास शिंदे व पत्रकार अल्ताफ शेख यांनी मांडली. याबाबत व्हाट्सअॅपवर संदेश टाकून सर्वांचा विचार घेण्यात आला. जवळपास सर्वांनी आनंदाने संकल्पनेला दुजोरा देत नियोजनास संमती दिली. विशेषतः महिलांनीही सकारात्मक प्रदिसाद देत या उपक्रमास सहभागास तयारी दर्शवली. मग वेळ व दिवस ठरविण्यात आला आणि दीपावलीच्या सुट्टीत घेण्याबाबत एकमत होऊन रविवार दि. 7 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 10 ते 3 यावेळेत मनोहरपूर (ता.अकोले) फाट्याजवळील निसर्गरम्य वातावरणातील नर्सरीत हा स्नेहमेळावा घेण्यात आला.

1993 नंतर प्रथमच 28 वर्षानंतर सवंगडी भेटणार असल्याने सर्वांना उत्सुकता होती. सकाळी 10 वाजेनंतर एक एक करत मित्र येवू लागले. सर्वजण गोळा झाल्यावर प्रत्येकाने आपला परिचय देताना शाळेतील नाव, घेतलेले शिक्षण, नोकरी व्यवसाय करत असल्याची माहिती व वैवाहिक जीवनाबाबत माहिती देवून एकमेकांचा परिचय करुन घेतला. प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेतील जुन्या आठवणी, टोपणनावे, विविध प्रसंगांची आठवण काढत हास्य विनोद केले. सर्वांनी एकत्रित छायाचित्रीकरण केले. दुपारी स्नेहभोजनही एकत्रितपणे केले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता निरोप घेताना सतीष शेटे, शिवाजी आवारी, पत्रकार अल्ताफ शेख, राजेंद्र देशमुख यांनी आभार व्यक्त करता भावना व्यक्त केल्या.

उद्योजक राजेंद्र देशमुख यांनी आपला हा ग्रुप कायम संपर्कात राहील. आपल्यातील एकमेकांना सहकार्य करू. सर्व मित्रांचा एक बचत गट करुन त्यात थेंबे थेंबे तळे साचवून त्यातून आपल्या सर्वांची मदत होईल. तसेच आपल्या सहकारी मित्रांच्या प्रसंगात उभे राहता येईल अशी संकल्पना मांडली. यास सर्वांनी सहमती दर्शवली. तसेच अंजना अडांगळे या मुंबईतस्थित मैत्रीनीने उपस्थित राहता न आल्याने सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. यावेळी संगीता बोर्हाडे (म्हसकुले), संगीता जाधव (मुळे), रोहिणी देशमुख, वनिता राजगुरू (वाकचौरे), पल्लवी तोष्णीवाल (मुंदडा), सुनंदा कानवडे (कोकणे), योगेश फटांगरे, राजेंद्र देशमुख, अल्ताफ शेख, शिवाजी आवारी, डॉ.हाफिज तांबोळी, डॉ.फिरोज तांबोळी, प्रकाश देशमुख, शरद देशमुख, जयंत देशमुख, सतीष शेटे, विलास शिंदे, शिवाजी काळे, मनोज कोकणे, मीनानाथ कवडे, पंकज कोल्हे, पांडुरंग अडांगळे, रामनाथ शिंदे, सुयोग मोहळे, सुभाष गोपाळे, विठ्ठल क्षीरसागर, चंद्रकांत कोकणे आदी उपस्थित होते.
