कोरोना विधवेने दहावीच्या परीक्षेत मिळविले 81 टक्के! कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने केला सोनाली सरोदेंचा सत्कार
महेश पगारे, अकोले
गेल्या वर्षी कोरोना महामारीमध्ये पतीचा मृत्यू झाल्याचे दुःख पचवून आंबड (ता. अकोले) येथील विधवा सोनाली सरोदे यांनी तत्काळ पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी दहावी परीक्षेची चांगली तयारी केली आणि तब्बल 81 टक्के गुण मिळविले. याबद्दल त्यांचा कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या सदस्यांनी त्यांच्या घरी जावून यथोचित सत्कार केला. यावेळी त्या भारावून गेल्या होत्या.
सोनाली सरोदे यांच्या माहेरी सहा बहिणी असल्याने त्यांचे नववीमध्ये असतानाच लग्न झाले. त्यामुळे पुढील शिक्षण अपूर्ण राहिले. मात्र, कोरोना विषाणूने त्यांचा भक्कम आधारच हिरावून नेला. त्यांच्या पतीच्या अकाली मृत्यूनंतर त्या खचल्या नाहीत. उत्तम शेती करुन त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. याशिवाय त्यांची तीन मुलेही शिक्षण घेत आहेत. मात्र, मुलांच्या भविष्यासाठी आणि रोजगारासाठी शिक्षण महत्त्वाचे असल्याने त्यांनी पुढील शिक्षण घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी पतीचे दुःख बाजूला सारुन तीन महिन्यांतच दहावीच्या परीक्षेची तयारी केली आणि परीक्षेत 81 टक्के गुण मिळविले.
या यशाबद्दल सोनाली सरोदे यांचा कोरोना एकल पुनर्वसन समितीचे हेरंब कुलकर्णी, संगीता साळवे, प्रतिमा कुलकर्णी, ललीत छल्लारे, मनोज गायकवाड, सुभान शेख, सुनील शेळके, संजय शिंदे, बाळासाहेब मालुंजकर आदिंनी शाल व पेढे देवून सत्कार केला. इतक्या आत्मीयतेने आपला सत्कार झाल्याबद्दल त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने मला शिकावेसे वाटले. त्यामुळे मी माझे पुढील शिक्षण पूर्ण करणार असून मुलांनाही खूप शिकवणार आहे.
– सोनाली सरोदे
सोनाली सरोदे यांनी महिलांना प्रेरक ठरेल असे यश मिळविले आहे. विधवा महिलांच्या शिक्षणासाठी यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करावा. यासाठी विद्यापीठा निवेदन देण्यात आले आहे.
– हेरंब कुलकर्णी (सामाजिक कार्यकर्ते)