तोतया पोलिसांनी केली वृद्धाची आर्थिक फसवणूक! वडगावपान जवळील प्रकार; 85 हजारांचा मुद्देमाल लांबवला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरात सुरु झालेल्या रस्तालुटीच्या प्रकारांमध्ये दिवसागणिक वाढच होत असून बुधवारी चंदनापुरी घाटात एकाला फसवून लुटल्यानंतर आता वडगावपान शिवारातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत मात्र दोघा चोरट्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करीत रहिमपूरमधील सत्तरवर्षीय शेतकर्‍याच्या बोटातील दोन तोळ्यांच्या अंगठ्यांसह त्यांची तब्बल 85 हजार रुपयांची फसवणूक करीत तेथून पोबारा केला. भरदुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलीस यंत्रणाही चक्रावली असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी धावपळ सुरु करण्यात आली आहे. या घटनेतून संगमनेरातून बाहेर पडणार्‍या मार्गांवर चोरट्यांनी बस्तान तर बांधले नाही ना? अशीही शंका निर्माण झाली आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.29) दुपारी सोडबारा वाजण्याच्या सुमारास वडगावपान शिवारातील रेणुका ट्रान्सपोर्टसमोर घडली. यातील फिर्यादी असलेले अण्णासाहेब बाबुराव शिंदे (वय 70, रा. रहिमपूर) हे वृद्ध शेतकरी वडगावपानकडून लोणीच्या दिशेने आपल्या दुचाकीवरुन जात असतांना वरील ठिकाणी आधीपासूनच सावजाच्या शोधात थांबलेल्या दोघांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे शिंदे यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला घेतली असता त्या दोघांनी त्यांच्याजवळ जावून त्यांची विचारपूस करीत विश्वास संपादन केला. आम्ही पोलीस आहोत, सध्या येथे नाकाबंदी लावण्यात आली असून काहीजण दुचाकीच्या डिकीत गांजा ठेवून त्याची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही वाहनांची तपासणी करीत आहोत. तुम्ही तुमच्या जवळील ऐवज तुमच्या दुचाकीच्या डिकीत काढून ठेवा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही असे सांगत दोघाही चोरट्यांनी त्या वृद्ध शेतकर्‍यास आपल्या हातातील दोन तोळे वजनाच्या व 80 हजार रुपये सरकारी मूल्य असलेल्या सोन्याच्या अंगठ्या व खिशातील पाच हजार रुपयांची रोकड दुचाकीच्या डिकीत ठेवण्यास सांगितले.

त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या शेतकर्‍याने आपल्याजवळील ऐवज डिकीत ठेवल्यानंतर दोघा भामट्यांमधील एकाने त्यांना बोलण्यात गुंग करुन दुसर्‍याने अलगद त्यांच्या डिकीतील मुद्देमाल काढून घेतला. आपले काम फत्ते झाल्यानंतर त्या दोघाही चोरांनी ‘बाबा तुम्ही जा, रस्त्यात कोठेही थांबू नका!’ असे सांगत त्यांना तेथून रवाना केले. सदरचा शेतकरी आपल्या घरी पोहोचल्यानंतर आपला ऐवज घेण्यासाठी त्यांनी दुचाकीची डिकी उघडली असता त्यांना धक्काच बसला. यावेळी घरातील अन्य मंडळींनी त्यांची विचारपूस केली असता त्यांनी घडला घटनाक्रम सांगितला. त्यातून त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर त्यांनी तालुका पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकाराबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात भा.दं.वि. कलम 419, 171, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार औटी यांच्याकडे देण्यात आला आहे. या घटनेनंतर संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळावर जावून पाहणी केली असून आपल्या पथकाला तालुका पोलिसांसह समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेने तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून संगमनेरातून बाहेर जाणार्‍या बहुतेक सर्वच रस्त्यांवर आता लुटीचे लोण पसरु लागल्याने चिंताही व्यक्त होवू लागली आहे.

बुधवारी (ता.28) पुण्याहून संगमनेरकडे येणार्‍या दुचाकीस्वाराला चंदनापुरी घाटात एकाने अडवले होते. त्यानेही आपल्या अंगात खाकी रंगाचा पेहराव केलेला असल्याने ‘त्या’ दुचाकीस्वाराने हा सरकारी कर्मचारी असल्याचा समज करुन घेतला व त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वर्दळीचा महामार्ग सोडून बंद असलेल्या जुन्या घाटरस्त्याने संगमनेरकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि तो चौघांकडून लुटला गेला. हा प्रकार ताजा असतानाच आता वडगावपान शिवारातही आपण पोलीस असल्याचे भासवून दोघांनी भरदिवसा वृद्ध शेतकर्‍यास फसवल्याने दुचाकीवरुन प्रवास करणार्‍यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *