कृषी अधिकार्यांकडून खंडणी वसूल करणार्यास रंगेहाथ पकडले राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल; माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून यायचा
नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरातील तालुका अधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता.14) राहुरी पोलिसांनी सापळा लावला. कृषी अधिकार्यांना ब्लॅकमेल करून, वेळोवेळी खंडणी वसूल करणार्या एका व्यक्तीला शासकीय पंचांसमक्ष दोन हजारांची खंडणी वसूल करताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. इब्राहिम फत्तुभाई शेख (रा. देवळाली प्रवरा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पत्रकार नसताना तो तसे भासवून मिरवत होता. माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे सांगत होता. आरोपी शेख तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे व देवळाली प्रवराचे मंडळ कृषी अधिकारी राहुल ढगे यांना तीन वर्षांपासून ब्लॅकमेल करून खंडणी वसूल करीत होता. तालुका कृषी अधिकारी ठोकळे यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना मोबाईलवरील खंडणी मागणीच्या ध्वनिफितींसह तक्रार अर्ज दिला. त्यावरून, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, कॉन्स्टेबल विकास साळवे, सचिन ताजणे, रोहित पालवे, रवींद्र कांबळे, शशीकांत वाघमारे यांच्या पथकाने दोन शासकीय पंचांसमक्ष आरोपीला दोन हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले.
ठोकळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे सांगून, शेख याने वेळोवेळी फोनवर व समक्ष भेटून पैशांची मागणी केली. तुम्ही पैशाचा अपहार केला आहे. तुमचा अपहार मी उघडकीस आणील. तुमच्याविरुद्ध उपोषण, आत्मदहन करील, अशी धमकी दिली. इमाने इतबारे काम करत असल्याचे सांगून, कोणताही अपहार केला नाही. असे वेळोवेळी सांगितल्यावर त्याने खोटेनाटे तक्रार अर्ज देऊन त्रास देण्यास सुरुवात केली. नाईलाजाने त्याला तीन हजार रुपये दिले. नंतर प्रत्येक महिन्याला दोन-तीन हजार रुपये घेऊन जाऊ लागला. 9 मार्च, 2021 रोजी त्याने सिमेंट खरेदीसाठी पंधरा हजारांची मागणी केली. त्यावेळी त्याचा मुलगा अझर इब्राहिम शेख त्याच्या मोबाईलवर सहा हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. असेही फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व नागरिकांना कोणीही इसम अनाधिकाराने कोणत्याही स्वरुपाची खंडणी मागत असल्यास तत्काळ राहुरी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी केले आहे.