साईबाबांच्या झोळीत ग्रामस्थांसह भाविकांनी टाकले दान विजयादशमीनिमित्त मंदिर व परिसराला केली फुलांची आरस
नायक वृत्तसेवा, शिर्डी
श्रद्धा सबुरीचा संदेश देणार्या साईबाबांनी आयुष्यभर काखेत झोळी अडकवून पाच घरी भिक्षा मागितली. त्यावर चरितार्थ चालवीत, रंजल्या गांजल्यांच्या सेवा केली. त्यांच्या मागे गेल्या शतकात भाविकांनी बाबांच्या झोळीत दररोज भरभरून दान टाकीत, त्यांच्या दरबाराला श्रीमंतीचा साज चढविला. आज बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त साईसंस्थानच्या झोळीत ग्रामस्थ व भाविकांनी धान्य व दक्षिणेचे दान टाकून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. बाबांची भिक्षाझोळी हे आज उत्सवाचे मुख्य आकर्षण होते.
देश-विदेशातील भाविकांमुळे बाबांच्या दरबाराची कीर्ती देश विदेशात पसरली. त्यांच्याच कृपेने देशातील श्रीमंत देवस्थानांच्या पंक्तीत बसण्याचा मान साईसंस्थानला मिळाला. कोविड प्रकोपामुळे भाविकांच्या दर्शन व्यवस्थेवर आणि संख्येवर देखील बंधने आले. ऑनलाईन दर्शन पास मिळविताना त्यांची दमछाक होऊ लागली, तरीही यंदाच्या उत्सवात साईसमाधी मंदिर सजविण्यात भाविकांनी परंपरागत उत्साहाने सहभाग घेतला.
आंध्रप्रदेशातील दानशूर साईभक्त नागाराज यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. स्थानिक साईभक्त सुनील बारहाते यांनी साईसमाधी मंदिर व परिसरातील इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई केली. रतलाम येथील साईभक्त अनिल सिसोदिया यांच्या पुढाकारातून साई सेवा समिती ट्रस्ट यांच्या पुढाकारातून साई मंदिर परिसरात ठिकठिकाणी रंगीबेरंगी सुबक रांगोळी काढण्यात आल्या. तदर्थ समिती सदस्य भानुदास पालवे, कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, साईमंदिर प्रमुख रमेश चौधरी, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी आजच्या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.