पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचा सिलसिला सुरूच कुरकुंडी शिवारात कार उलटली; चौघेजण बालंबाल बचावले
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्या नवीन पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचा सिलसिला सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. महामार्गावरील कुरकुंडी शिवारात महामार्गाच्या कडेला साईडगटारात गुरुवारी (ता.24) मध्यरात्रीनंतर दीड ते दोन वाजेच्या सुमारास कार उलटली आहे. या अपघातात सुदैवाने चौघेजण बालंबाल बचावले असून, कारचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कुरकुंडी शिवारातील वायाळवाडी येथे गुरुवारी मध्यरात्रीनंतर दीड ते दोन वाजेच्या सुमारास महामार्गाच्या कडेला असलेल्या साईडगटारीत कार उलटली आहे. कार उलटल्याची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख, चालक संतोष फड यांनी घटनास्थळी धाव घेतली.
केवळ दैव बलवत्तर असल्याने चौघेजण बालंबाल बचावले आहेत. सकाळी डोळासणे महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, सुनील साळवे, मनेष शिंदे, नंदकुमार बर्डे, अरविंद गिरी, योगीराज सोनवणे यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने वारंवार अपघात होत आहे. तर वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होवूनही अपघात होत आहेत. यावरुन महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.