पाचशे लोकांना विवाह समारंभ व जाहीर कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास परवानगी द्या!
पाचशे लोकांना विवाह समारंभ व जाहीर कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास परवानगी द्या!
राहाता तालुका मंगल कार्यालय, लॉन्स व मंडपवाले व्यावसायिकांचे आमदार राधाकृष्ण विखेंना निवेदन
नायक वृत्तसेवा, राहाता
विवाह समारंभ व अन्य कार्यक्रमांसाठी 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास मनाई असल्याने मंगल कार्यालय, लॉन्स व मंडपवाले तसेच या व्यवसायावर अवलंबून असलेले छोटे व्यावसायिक, कलाकार हे रोजगाराअभावी घरी बसले आहेत. जिल्ह्यात एक लाखाहून अधिक कुटुंबांना या निर्बंधाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका बसला आहे. सुरक्षित अंतराची काटेकोर अंमलबजावणी करून पाचशे लोकांना विवाह समारंभ व जाहीर कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मंगल कार्यालय, लॉन व मंडपवाले व्यावसायिक यांनी माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांच्याकडे केली आहे.

सदर निवेदनात म्हंटले आहे की, तुम्ही आमच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या कानी घाला. अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक फिरण्यासाठी जाहीर कार्यक्रम व विवाह समारंभावरील संख्येची अट पन्नासवरून पाचशे करा. कसेही करून पाचवर एक शून्य वाढवा. हे केल्याशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणे अशक्य आहे. आम्ही सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझेशनची काळजी घेऊ, असा शब्द यावेळी मंगल कार्यालय, लॉन्स व मंडपवाले व्यावसायिकांनी दिला. तालुक्यात 50 हून अधिक मंगल कार्यालय व लॉन्स, 100 हून अधिक मंडपवाले आहेत. विवाह व अन्य समारंभाच्या उपस्थितीची अट 50 वरून 500 केली तर फुल सजावटकार, घोडा बग्गीवाले, छायाचित्रकार, बँडवाले, पारंपारिक वाजंत्री, साऊंड सिस्टीम, लाईटींग, वाढपी, सुरक्षारक्षक अशा हजारो व्यक्तींना रोजगार मिळेल. त्यांचे व्यवसाय सुरू होऊन त्यांना रोजीरोटी मिळेल. यातून यावर अवलंबून अन्य व्यावसायिकांना देखील चालना मिळू शकेल. विवाह समारंभ व अन्य कार्यक्रमासाठी 50 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यास मनाई असल्याने हजारो जणांचा रोजगार गेला आहे. या व्यवसायाशी निगडीत हातावर पोट असलेले कारागीर व व्यावसायिक घरी बसले आहेत. तालुक्यात 100 हून अधिक मंडपवाले व फूल सजावटकार यांचा व्यवसाय बंद पडला आहे. तीसहून अधिक बँड, डीजे, घोडेमालक तालुक्यात आहे. लॉन्स, मंगल कार्यालये कोरोना निर्बंधामुळे ओस पडली आहेत. जिल्ह्यात एक लाखाहून अधिक कुटुंबांना त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका बसला आहे. सुरक्षित अंतराची काटेकोर अंमलबजावणी करून पाचशे लोकांना विवाह समारंभासाठी व जाहीर कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

दोन ते अडीच कोटी रुपयांची गुंतवणूक करून राहाता तालुक्यात 30 ते 40 मंगल कार्यालय, लॉन्स उभी राहिली आहे. यांच्या माध्यमातून लग्नसराईमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे तीन हजार क्षमता असलेल्या मंगल कार्यालयांना पन्नास लोकांच्या समारंभाची परवानगी कशी परवडेल? सुरक्षित अंतर, सॅनिटायझेशनस व अन्य मार्गाने काळजी घेऊन पाचशे व्यक्तींच्या समारंभास परवानगी मिळावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य, गणेशचे माजी संचालक व सिद्ध संकल्प लॉन्सचे संचालक दिलीप रोहोम यांनी देखील केली आहे.

राहाता तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात व गावात दोन ते तीन मंडपवाले आहे. किमान पाचशे व्यक्तींच्या उपस्थित कार्यक्रमाला परवानगी दिल्याशिवाय या व्यवसायाला चालना मिळणार नाही. या मागण्यांचे निवेदन आमदार राधाकृष्ण विखे यांना दिले असून त्यांनी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे.
– बाळासाहेब सोनटक्के (मंडपवाले, राहाता)
