राहुरी पाठोपाठ श्रीरामपूर आणि शेवगाव शहर हद्दीत ‘लॉकडाऊन’

राहुरी पाठोपाठ श्रीरामपूर आणि शेवगाव शहर हद्दीत ‘लॉकडाऊन’
श्रीरामपूरमध्ये 13 ते 20 सप्टेंबर तर शेवगावमध्ये 10 ते 13 सप्टेंबरपर्यंत बंद
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून लॉकडाऊन बाबत निर्णय घेण्यास प्रशासनाला मर्यादा आल्या आहेत. मात्र, दुसरीकडे कोरोना संसर्गाचा कहर वाढतच चालला असल्यामुळे आता सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकच एकत्र येऊन आपला तालुका, शहर लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय घेऊ लागले आहेत. राहुरी तालुक्यापाठोपाठ आता श्रीरामपूर शहर हद्द व शेवगाव शहर हद्द येथेही लॉकडाऊन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांनी एकत्र येत घेतला आहे.


दोनच दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठकीत नागरिकांनीच राहुरी तालुका 10 ते 17 सप्टेंबर याकाळात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच बुधवारी (ता.9) श्रीरामपूर नगरपालिका स्तरावर सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली असून त्यामध्ये श्रीरामपूर शहर हद्दीत 13 ते 20 सप्टेंबर याकाळात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी याबाबत माहिती दिली. आदिक यांनी सांगितले की, ‘श्रीरामपूर शहर हद्दीत बंद करण्याबाबत बुधवारी आमची सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा झाली. कोरोनामुळे भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांची संख्या बाराशेच्या घरात गेली आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागावा, यासाठी बंद करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत कोणीही पक्षभेद न करता सहकार्य करीत हा निर्णय घेतला आहे. आता उद्यापासून 12 सप्टेंबर पर्यंत लोकांना खरेदीसाठी वेळ देणार आहोत. त्यानंतर 13 ते 20 सप्टेंबर याकाळात श्रीरामपूर शहर बंद राहणार आहे.’ तर, शेवगाव शहराच्या हद्दीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे शेवगाव नगरपालिकेच्या नगरसेवकांनी देखील एकत्र येऊन बैठक घेत 10 ते 13 सप्टेंबर असे चार दिवस शेवगाव शहर हद्दीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.


दरम्यान, अहमदनगर शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी लॉकडाऊन करण्याची मागणी केली होती. परंतु त्याला यश न आल्याने त्यांनीही पुढे हा विषय सोडून दिला. भाजपच्या काही नेत्यांनी देखील लॉकडाऊन करण्याबाबत पूर्वी मागणी केली होती. मात्र, मंदीर उघडण्यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन केले. त्यानंतर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनीही लॉकडाऊनच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. त्यातच आता राहुरी तालुक्यानंतर श्रीरामपूर शहर व शेवगाव शहर येथे लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला आहे.

Visits: 14 Today: 1 Total: 117643

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *