संगमनेर शहरातील पहिली ‘धोकादायक’ इमारत ‘अखेर’ पाडली! सय्यदबाबा चौकातील ‘महाराष्ट्र वेल्डिंग वर्क्स’ पालिकेकडून जमीनदोस्त

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील धोकादायक वास्तू म्हणून घोषित करण्यात आलेल्या 76 इमारतींपैकी एकावर ‘अखेर’ आज पालिकेच्या ‘जेसीबी’चा पंजा पडला. पीरपंचाच्या मालकीच्या सय्यदबाबा चौकातील या इमारतीवर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज भल्या सकाळी ही कारवाई केली. त्यामुळे ‘धोकादायक’ ठरलेल्या आणि पालिकेकडून नोटीस बजावण्यात आलेल्या अन्य भोगवटादारांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सदर जागा मालक आणि भोगवटादार यांच्या गेल्या 2017 पासून न्यायालयात दावा सुरू आहे. असे असतानाही पालिकेने आपला ‘विशेषाधिकार’ वापरुन मानवी जीवितहानी टाळण्यासाठी सदरची कारवाई केली आहे.

गेल्या फेब्रुवारीमध्ये पुण्यातील आपत्ती व्यवस्थापन चमूकडून संगमनेर शहरातील शासकीय व निमशासकीय इमारतींसह अन्य जून्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यातून संगमनेरच्या समृद्धीचे प्रतीक ठरलेल्या नवीन नगर रस्त्यावरील साथी भास्करराव दुर्वे (नाना) व्यापारी संकुलातील 34 गाळेधारक भोगवटादार, वाल्मिकी समाजासाठी पालिकेने चव्हाणपुरा परिसरात उभारलेली इंदिरा वसाहतीतले 36 भोगवटादार, मोमीनपुर्यातील अंजूमन इमारतीत राहणारे 16 जण, परदेशपुर्यातील तीन, पार्श्वनाथ गल्ली, बाजारपेठ व सय्यदबाबा चौकातील प्रत्येकी दोन, मेनरोड, कोष्टी गल्ली, खंडोबागल्ली, नारळगल्ली, मोमीनपुरा, चंद्रशेखर चौक, सुतारगल्ली, शिकलकर गल्ली, तेलीखुंट, साईनाथ चौक व साळीवाडा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 107 दुकाने व घरे ‘धोकादायक’ ठरली होती.

त्यामुळे शासकीय नियमानुसार पालिकेने या सर्वांना मार्चमध्ये नोटीसा बजावून आपल्या ताब्यातील इमारत, घर अथवा गाळे खाली करण्यास सांगीतले होते. मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्याने पालिकेने केवळ सोपस्कार पूर्ण केल्याचे समजून यातील बहुतेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातच नवीन नगर रस्त्यावरील दुर्वेनाना व्यापारी संकुल व चव्हाणूपर्यातील इंदिरा वसाहत अशा दोन्ही ठिकाणच्या मिळून 70 जणांना आठ दिवसांत इमारत खाली करण्याची नोटीस बजावली गेल्याने शहरात हडकंप माजला होता. प्रत्यक्षात या गोष्टीलाही आता जवळपास महिना उलटल्याने पालिका कोणतीच कारवाई करीत नाही असा समज करुन वरील सर्व मालक व भोगवटादार निवांत झाले होते.

वरील सर्वांना नोटीसा बजावल्यानंतर दुर्वेनाना व्यापारी संकुल व इंदिरा वसाहत यांच्याप्रमाणेच सय्यदबाबा चौकातील महाराष्ट्र वेल्डिंग वर्क्सचे मालक नुरुलअमीन अहमदखान पठाण यांनी 22 सप्टेंबररोजी पालिकेच्या नोटीसला उत्तर देत सदर जागेबाबत संबंधित जागेचे मालक असलेले सादिक पीरपंच ट्रस्ट व आपल्यात दिवाणी न्यायालयात दावा सुरू असल्याचे लेखी म्हणणे सादर केले. मात्र पालिकेनेही त्याला तत्काळ उत्तर देत संबंधित न्यायालयाने पालिकेला कोणताही मनाई हुकूम बजावलेला नाही, तसेच दावा सुरु असला तरीही सदरची इमारत धोकादायक असल्याने ती कोसळल्यास मानवी जीवित हानी होण्याची दाट शक्यता असल्याने अशी इमारत जमीनदोस्त करण्याचा पालिकेला अधिकार असल्याचे सांगत पठाण यांचा दावा खोडून काढला होता.

त्यानंतर गेल्या 28 ऑक्टोबर रोजी त्यांना 48 तासांत सदरचा इमला खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली. सदरचे जागेचे मूळ मालक असलेल्या पीरपंच यांनाही नोटीस देण्यात आली होती. त्यांनी मात्र दावा सुरु असला तरीही सदरची इमारत जमीनदोस्त करण्याची विनंती पालिकेला केली होती व त्याचा खर्चही उचलण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार पालिकेने आज (ता.3) सकाळी सात वाजता सय्यदबाबा चौकातील अत्यंत मोक्याच्या जागी असलेली ‘महाराष्ट्र वेल्डिंग वर्क्स’ ही इमारत पूर्णतः जमीनदोस्त केली. शहरातील धोकादायक इमारतींना नोटीसा बजावल्यानंतर काहीकाळ खळबळ उडाली होती, मात्र नेहमीप्रमाणे पालिकेने कोणतीच कारवाई न केल्याने अशा इमारतींमध्ये असणार्यांचे मनोधैर्य उंचावले होते. या कारवाईने मात्र आता सर्वांचेच धाबे दणाणले असून ‘मेरा नंबर कब आएगा’ची प्रतीक्षा सुरू झाली आहे.

2200 वर्षांहून अधिक मोठा इतिहास असलेल्या संगमनेरात अनेक वास्तू जून्या व जीर्ण अवस्थेत आहेत. पावसाळ्यात त्या कोसळून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने संगमनेर नगरपालिकेने आठ महिन्यांपूर्वी अशा सर्वच इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते व त्यातल धोकादायक इमारती खाली करण्याच्या नोटीसाही बजावल्या होत्या. मात्र गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत पालिकेने नोटिसा बजावण्याशिवाय काहीच न केल्याने धोकादायक इमारतींमध्येही भोगवटादार आनंदाने नांदत होते. मात्र आज सकाळी पालिकेने अचानक कारवाई केल्याने या सर्व भोगवटादारांमध्ये खळबळ उडाली असून आता यातील प्रत्येकजण ‘मेरा नंबर कब आएगा’ याची प्रतीक्षा करीत आहेत.

