‘ऑपरेशन मुस्कान’; 59 बेपत्ता असणार्यांचा लागला शोध! 40 महिला व तरुणी, 10 पुरुष, 7 अल्पवयीन मुली व 2 मुले; संगमनेर शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

महेश पगारे, संगमनेर
जिल्हा पोलीस दलाने बेपत्ता, महिला, तरुणी, अल्पवयीन मुले-मुली यांचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविले होते. त्यानुसार संगमनेर शहर पोलिसांच्या स्वतंत्र पथकाने 2018 पासून बेपत्ता झालेल्या 40 महिला व तरुणी, 10 पुरुष, 7 अल्पवयीन मुली व 2 अल्पवयीन मुले अशा एकूण 59 बेपत्ता असणार्यांचा शोध घेतला आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय्’ या ब्रीदवाक्यानुसार पोलिसांनी जबाबदारी निभावल्याने त्यांच्यावर समाजातील सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

एरव्ही पोलीस म्हटले की जवळ जाणेच नको, अशीच भावना सर्वसामान्यांची असते. परंतु, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि रात्रं-दिवस नागरिकांचे रक्षण करणारे पोलीस दादाच मदतीला येतात याचा अनेकदा प्रत्यय आलेला आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे एवढेच काम नसून गुन्हा घडूच नये यासाठी देखील पोलीस सतत प्रयत्नशील असतात. मात्र, कर्तव्याचा भाग म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्यात आले. ही मोहीम संगमनेर शहर पोलिसांनी नेटाने राबवत जंग-जंग पछाडत सन 2018 पासून बेपत्ता असलेल्या 40 महिला व तरुणी, 10 पुरुष, 7 अल्पवयीन मुली व 2 अल्पवयीन मुलांचा शोध घेतला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने आणि शहराचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथकाची निर्मिती करण्यात आलेली होती. या पथकात उपनिरीक्षक रोहिदास माळी, पोलीस शिपाई सुभाष बोडके, अमृत आढाव, महिला पोलीस कल्पना हासे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी शोध मोहीम राबवत 59 बेपत्ता असणार्यांचा शोध घेतला आहे. याबाबतचा अहवाल नुकताच जिल्हा पोलीस प्रमुख पाटील यांना सादर केला आहे.
तत्पूर्वी, प्रलंबित असलेले गुन्हे यानिमित्ताने निकाली निघाल्याने पोलिसांवरील ताणही कमी झाला आहे. मात्र, पालकांनी आपल्या पाल्यांची वाट चुकू न देण्यापूर्वीच योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. अन्यथा फसव्या प्रेमापोटी आणि गुन्हेगारी मैत्रीच्या सान्निध्यात येवून आयुष्य उद्धवस्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेची आहे. दरम्यान, शहर पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेचे नागरिकांतून कौतुक होत आहे.


