शेतकर्यास अरेरावीची भाषा करणार्यास निलंबित करा ः पानसरे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील नेहरु चौकात शेतकर्यास अरेरावीची भाषा करुन जादा दराने बाजार कर गोळा करणार्या पालिका कर्मचार्याचे निलंबन करावे. आणि यापुढेही शेतकर्यांबरोबर गैरप्रकार करणार्यांस शेतकरी जशास तसे उत्तर देतील, असा इशारा किसान युवा क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सीताराम पानसरे यांनी दिला आहे.
![]()
3 जुलैला खांडगाव येथील युवा शेतकरी दीपक गुंजाळ याच्याबरोबर संगमनेर नगरपालिकेच्या कर्मचार्याने अरेरावीची भाषा करुन धक्काबुक्की केली. तसेच पालिकेने ठरवून दिलेल्या दरपत्रकापेक्षा जास्त पैशांची पावती शेतकर्याकडून आकारली. या घटनेची माहिती समजताच किसान युवा क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सीताराम पानसरे यांनी संबंधित शेतकर्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. त्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर साहेब यांना संघटनेचे निवेदन देऊन घडलेल्या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन करत प्रकाश शिंदे नामक कर्मचार्याचे निलंबन करण्याची मागणी केली. यापुढे देखील शेतकर्यांबरोबर कुणीही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी त्याच ठिकाणी जशास तसे उत्तर देतील, असा इशारा देखील पानसरे यांनी दिला आहे.

